छत्रपती संभाजीनगर : खासगी शाळांमधील विद्यार्थी स्वखर्चाने दरवर्षी सहलीचा मनमुराद आनंद घेत असतात. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे हे भाग्य ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नशिबी नसते. मात्र, समग्र शिक्षा अभियानाने राष्ट्रीय आविष्कार अभियानाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचे सहलीचे स्वप्न सत्यात उतरविले आहे.
जिल्ह्यातील ३६ विद्यार्थी शनिवारी दुपारी बंगळुरूकडे रवाना होताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. विशेष म्हणजे, या सहलीचा संपूर्ण खर्च शासनाने केला आहे. विशेष म्हणजे, या सहलीसाठी निवड झालेले अनेक विद्यार्थी पहिल्यांदाच बसने प्रवास करत आहेत. घरची बेताची आर्थिक परिस्थिती व कौटुंबिक अडचणींमुळे ते कधी गावाबाहेर गेलेच नव्हते. त्यामुळे सहलीला जाताना त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आनंद आणि समाधान दिसून आले.
विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण, सांस्कृतिक वृद्धीकरण, सामान्यज्ञानात वाढ व आनंददायी शिक्षणास मदत होईल, या हेतूने समग्र शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियानाद्वारे राज्याबाहेर विद्यार्थ्यांची सहल नेण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांची निवड करताना मागील दोन- तीन वर्षांत शाळा शंभर टक्के प्रगत असावी, विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळविलेले असावे, हे निकष अंमलात आणण्याच्या मार्गदर्शक सूचना होत्या. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी विभागीय आयुक्तांच्या ‘इस्रो’ला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना विमानाने सफर करावी. त्यासाठी स्पर्धा परीक्षा घेऊन तालुकानिहाय प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची निवड करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. या स्पर्धा परीक्षेत पहिले टॉप तीन विद्यार्थी सोडून त्याखालील चार विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आविष्कार अभियानाच्या सहलीसाठी निवड करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ३६ विद्यार्थ्यांची निवड केली. या मुलांसोबत एक महिला व एक पुरुष शिक्षक, समग्र शिक्षा अभियानाचे दोन प्रतिनिधी सहलीला निघाले आहेत. ३० मार्च रोजी हे विद्यार्थी शहरात परतणार असून यासाठी २ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शनिवारी दुपारी एका ट्रॅव्हल्स बसने हे विद्यार्थी पाच दिवसांच्या सहलीवर गेले. हे विद्यार्थी प्रथम बंगळुरू येथे जातील. तेथे विज्ञान प्रयोगशाळांसह विविध ठिकाणी भेटी देतील. त्यानंतर ते आंध्र प्रदेशातील कुप्पम शहरातील अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनच्या विज्ञान-कला शिक्षणासंबंधी रामानुजन गणित प्रयोगशाळा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच डिजिटल प्रयोगशाळांना भेट देणार आहेत.