औरंगाबाद : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्वारे प्रति दिन किमान ५५ लिटर शुद्ध पाणी देण्यासाठी जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग सरसावला आहे. सन २०२४ अखेरपर्यंत ‘जलजीवन मिशन’ योजनेंतर्गत ग्रामीण भागात सर्वांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळेल, या दिशेने पावले टाकण्यात आली असून, जिल्ह्यात १२८८ पैकी ६०५ कामांना प्रत्यक्ष सुरूवातही झाली आहे, तर ४२ कामे पूर्ण झाली आहेत.
यासंदर्भात जि. प. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात वाढत्या लोकसंख्येनुसार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, स्वयंपाक आणि घरगुती वापरासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे या जलजीवन मिशन योजनेचे ध्येय आहे. हा उपक्रम सन २०२४पर्यंत पूर्णत्वाकडे नेला जाईल. या अंतर्गत पाणीपुरवठ्याचे पुढील ३० वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे. २०पेक्षा जास्त कुटुंब असलेल्या वसाहतींमध्ये देखील ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत १,२८० गावांमध्ये १,२८८ पाणीपुरवठ्याच्या योजना प्रस्तावित आहेत. शाळा व अंगणवाडीला देखील डोळ्यासमोर ठेवून नळाद्वारे शाश्वत व शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी गावांमधील जनतेला यामध्ये सहभागी करून घेतले जात आहे. यामुळे योग्य नियोजन आणि शाश्वत पाणीपुरवठा निर्माण होण्यास मदत होत आहे. जि. प. पाणीपुरवठा विभागाकडे असलेले अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता, या योजनेसाठी १९ खासगी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, पुढील महिन्यात आणखी २० अभियंते नियुक्त केले जाणार आहेत.
प्रतिक्रिया मुदतीत कामे पूर्ण होणारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जलजीवन मिशन’ची कामे गतीने सुरू आहेत. राज्याने नियुक्त केलेल्या व्यापकोस एजन्सीचे अभियंते तसेच जि. प., १९ खासगी नियुक्त केलेल्या अभियंत्यांनी युद्धपातळीवर योजनेची कामे हाती घेतली आहेत. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीच्या आत अर्थात सन २०२४पर्यंत या योजनेची कामे पूर्ण होतील, या दिशेने प्रयत्न करत आहोत.- अजित वाघमारे, कार्यकारी अभियंता, जि. प. पाणीपुरवठा विभाग
जलजीवन मिशनची स्थिती एकूण गावे - १२८०पा. पु. योजना - १२८८सर्वेक्षण पूर्ण - १२८७डीपीआर तयार - १२३१तांत्रिक मंजुरी - ११७१प्रशासकीय मान्यता - ११२९टेंडर प्रक्रिया - १०२६कार्यारंभ आदेश - ६२६कामे पूर्ण - ४२