छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यासाठी आनंदाची वार्ता आहे. सतत पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या जिल्ह्यातील ११० गावांचा पाणीप्रश्न आता कायमचा मिटला आहे. या गावांतील कुटुंबांना नळाद्वारे प्रतिमाणसी ५५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला असून, प्रशासनाने ही गावे ‘हर घर जल’ घोषित केली आहेत. जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १२९७ गावांना शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी ११६१ योजना हाती घेतल्या आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागात या योजनांच्या कामांवर देखरेख करण्यासाठी अभियंत्यांची टंचाई असतानाही अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ४८८ गावांतील योजना पूर्ण केल्या आहेत. सद्य:स्थितीत ११० गावांत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असून यासंबंधीची नोंद केंद्रशासनाच्या संकेतस्थळावर भरण्यात आली आहे. जलजीवन मिशनची कामे दर्जेदार व्हावीत, गावातील प्रत्येक कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा व गावे ‘हर घर जल’ घोषित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना हे सातत्याने आढावा घेत असून या कामांत येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन सुदर्शन तुपे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे हे जल जीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
पाणीपुरवठा सुरू झालेली गावेजिल्ह्यात औरंगाबाद तालुक्यातील १० गावे, गंगापूर- १७ गावे, कन्नड- १५ गावे, खुलताबाद- ०३, पैठण- ०३, फुलंब्री- ०८ गावे, सिल्लोड- १७ गावे, सोयगाव- ०९ गावे, वैजापूर- २८ गावांमध्ये प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.