छत्रपती संभाजीनगर : शहराला दिलासा देण्यासाठी युद्धपातळीवर जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले. १ फेब्रुवारीपासून शहराला अतिरिक्त ७० एमएलडी पाणी मिळेल. दोन दिवसांआड शहराला पाणी देण्याची घोषणाही मनपाने करून टाकली होती. या कामात पंप खरेदीसाठी थोडासा विलंब होत असून, १५ फेब्रुवारीला पाणी येईल, असा दावा मंगळवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केला. नागरिकांना उन्हाळ्यापूर्वी मुबलक पाणी मिळणार, हे निश्चित.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी स्मार्ट सिटीच्या सभागृहात नवीन पाणीपुरवठा योजना, २०० कोटी रुपयांच्या आपत्कालीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. यावेळी मनपा प्रशासक जी. श्रीकांत, अतिरिक्त शहर अभियंता ए. बी. देशमुख, एमजेपीचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता के.एम. फालक, एम.बी. काझी यांच्यासह कंत्राटदार एजन्सींचे प्रतिनिधी उपस्थिती होती. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी ९०० मिमी व्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम वेळेत पूर्ण न केल्यास बिल रोखले जाईल, असा इशारा डॉ. कराड यांनी दिला. किर्लोस्कर कंपनीला मोठ्या अश्वशक्तीच्या पंपाची ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून पंप देण्यास विलंब होत आहे.
प्रशासकांचा संतापमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून प्रशासक जी. श्रीकांत संतापले. अगोदर ३० डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार होते. आता लांबणीवर कसे गेले? किर्लोस्कर कंपनीसोबत आपण बोलू आणि पंप तातडीने तयार करण्यास सांगू, असे ते म्हणाले. पंप वेळेत उपलब्ध झाले. तर १४ फेब्रुवारीपासून शहराला २ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
१४५० अश्वशक्तीचे २ पंपनवीन ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीसाठी १४५० अश्व शक्तीचे दोन पंप लागणार आहेत. पंप ऑर्डर दिल्यानंतरच कंपनी तयार करीत असते. कंत्राटदाराने २ महिन्यांपूर्वीच ऑर्डर दिली आहे. परंतु, ८० टनांचा एक पंप असल्याने ते तयार करण्यास उशीर लागत आहे.