औरंगाबाद : यंदा सरासरीपेक्षा तिप्पट पाऊस बरसल्याने मराठवाड्याची टँकरवाडा म्हणून झालेली ओळख यंदा मिटली आहे. या पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. मराठवाड्यात सर्वाधिक भूजल पातळी औरंगाबाद जिल्ह्यात ५.१३ मीटरने वाढली आहे.
प्रादेशिक उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने दरवर्षी सप्टेंबर महिन्यात भूजल सर्वेक्षण केले जाते. यंदाही मराठवाड्यातील ७६ तालुक्यांतील ८७५ विहिरींच्या पाणी पातळीची तपासणी करण्यात आली. सर्व तालुक्यांत भूजल पातळी वाढली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात मागील ५ वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ५.१३ मीटरने भूजल पातळी वाढली. त्यातही यंदाच्या पावसाळ्यात २.११ मीटरने पाणी पातळी वाढल्याचे निदर्शनात आले आहे.
यात यंदा खुलताबाद तालुक्यात जास्त पाऊस पडून भूजल पातळी २.५३ मीटरने वाढली. तर ५ वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत वैजापूर तालुक्यात ७.५३ मीटरने पाणी पातळी वाढली आहे, तर लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात यंदा ४.०३ मीटरने पाणी पातळी वाढली असली तरी प्रत्यक्षात मागील ५ वर्षांतील सरासरीच्या तुलनेत फक्त ०. ११ मीटरनेच पाणी पातळी वाढली आहे. ही सर्वात कमी पाणी पातळी वाढल्याची नोंद झाली आहे. पर्जन्यमानानुसार ७६ तालुक्यांपैकी ६६ तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. २० टक्के तूट असलेली परभणी, गंगाखेड, लातूर, चाकूर, तुळजापूर, भूम, वाशी व आष्टी या तालुक्यांचा समावेश आहे, अशी माहिती उपसंचालक डॉ. एम. डी. देशमुख यांनी दिली.
भूजल पातळी नोंदजिल्हा सप्टेंबरपर्यंत ५ वर्षांतील सरासरीच्या तुलनेत वाढऔरंगाबाद २.११ ५.१३ जालना २.८६ २.०६ परभणी ४.१२ १.८९ हिंगोली २.३९ १.४० नांदेड ३.५८ १.७८ लातूर ३.६७ ०.९२ उस्मानाबाद १.८९ २.८८ बीड २.६१ २.१६ एकूण २.९० २.२८
(पाणी पातळी मीटरमध्ये )