छत्रपती संभाजीनगर : साडेचार वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासन आणि आर्थिक पातळीवर गाडा रुळावर आणण्याची गरज होती. त्यास यश मिळाले. मागील वर्षी विद्यापीठाचे बजेट ३५ कोटी रुपये शिलकीत राहिले. याच काळात तीन वेळा ॲट्रॉसिटीची तक्रार, दोन वेळा विधिमंडळात हक्कभंग आणण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हाेते. यावेळी कुलसचिव डॉ. भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. प्रशांत अमृतकर, सामान्य प्रशासनचे प्रभारी अधिकारी डॉ. कैलास पाथ्रीकर, संयोजक डॉ. संजय शिंदे यांची उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, मी ४१ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. साडेचार वर्ष कुलगुरूपदी उत्तम काम करता आले. महामानवाच्या नावाने असलेल्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रुजू होण्यापूर्वी १२ वेळेस कुलगुरूंच्या शेवटच्या पाच जणांत निवड व्हायची. मात्र, मराठवाड्यात सेवा देण्याचे माझ्या भाग्यात होते. शैक्षणिक गुणवत्ता, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार व गतिमान प्रशासन ही साडेचार वर्षांच्या कारकिर्दीची चतुःसूत्री राहिली. तसेच ‘कोविड लॅब’सह अनेक उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकीची ही जोपासना केल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यकाळातील ठळक घटना- कोविड काळात दोन लॅबमधून ५ लाखांपेक्षा अधिक टेस्ट.- फाईल ट्रॅकरच्या माध्यमातून १२ लाख कागदपत्रे स्कॅन.- पदव्युत्तरची प्रवेश परीक्षा बंद करीत मुक्त प्रवेश दिला.- चार वर्षांत विनाहस्तक्षेप गुणवत्तेवर करार पद्धतीने प्राध्यापक भरले.- ३०० कोटींचे विकासात्मक प्रकल्प शासनाकडे सादर.- ४० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित संतपीठ सुरू केले.- २०२१ पर्यंतचे नागपूर एजीकडून विद्यापीठाचे ऑडिट.- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन.- नामांतर लढ्याच्या शहीद स्मारकाला सुरुवात.- २८ प्राध्यापकांचे प्रश्न निकाली, १०० पेक्षा अधिक प्राध्यापकांना पदोन्नती.- वेगवेगळ्या इमारती, वसतिगृहासह इतर पायाभूत सुविधांची कामे पूर्णत्वास.