बिडकीन (औरंगाबाद): स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांनिमित्त केंद्र सरकारने 'हर घर तिरंगा' उपक्रमाचे आयोजन केले आहे. या मोहिमे अंतर्गत मोठ्याप्रमाणावर कार्यक्रमांचे केंद्र सरकारने आयोजन केले आहे. यात आता नागरिक देखील हिरीरीने सहभागी होत आहे. औरंगाबादपासूनजवळ असलेल्या बिडकीन येथे एक महाविद्यालय या मोहिमेत अनोख्या पद्धतीने सहभागी झाले आहे. कृष्णापुर येथील एचपीएल माध्यमिक विद्यालय व किलबिल प्राथमिक शाळेच्यावतीने आज सकाळी तब्बल ३७५ फुट लांब तिरंगा ध्वजाची रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थी, पालक, शिका यांच्यासह ग्रामस्थांनी उत्फूर्त सहभाग घेतला.
कृष्णापुर येथे एचपीएल माध्यमिक विद्यालय व किलबिल प्राथमिक शाळा आहे. यावर्षी स्वातंत्र्यदिन भव्य पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचे आयोजन केले आहे. महाविद्यालयाने देखील या मोहिमेत भव्यदिव्य पद्धतीने सहभागी होण्याचा निर्धार केला . या अनुषंगाने तब्बल ३७५ फुट लांबीच्या तिरंगा ध्वजाची प्रभात फेरी काढण्याचे निश्चित करण्यात आले.
आज सकाळी महाविद्यालयाच्या आवारातून फेरीस सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी ३७५ फुट लांबीचा झेंडा हातात उचलून धरत गावातून फेरी काढली. या अनोख्या फेरीत ग्रामस्थांनी देखील सहभाग घेतला. भारत माता की जय, हर घर तिरंगा अशा घोषणांचा जयघोष करत संपूर्ण गावातून ही फेरी काढण्यात आली. देशभक्तीची भावना विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमात मुख्याध्यापक संभाजी जाधव व सुजित देशमुख, सरपंच सारिका पेरे, अश्पाक सय्यद, पांडुरंग गरड, हरिभाऊ बोडखे ,हरिभाऊ गरड, सुरेश जाधव ,अनिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यु. बी. मिसाळ, व्ही.व्ही. आव्हाने, व्ही. बी. तेजीनकर, दिपक मोरे, गणेश इंदापुरे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सपोनि संतोष माने यांनी फेरीच्या दरम्यान पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवला.