छत्रपती संभाजीनगर : आरटीआयच्या नावाखाली उद्योजकांना खंडणी मागणाऱ्यांची औद्योगिक वसाहतींमध्ये संख्या वाढली आहे. कंपन्यांसह अधिकाऱ्यांवरही दबाव टाकतात. त्यांचा हा त्रास किती दिवस सहन करायचा, असा प्रश्न करत उद्योजकांनी अशा खंडणीखोरांना आवर घालण्याची कळकळीची विनंती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे केली.
औद्योगिक सुरक्षा आणि संबंधित समस्या या विषयावर मसिआतर्फे बुधवारी दुपारी ४ वाजता वरिष्ठ पोलिस अधिकारी व उद्योजकांची विशेष बैठक घेण्यात आली. पोलिस व उद्याेजकांमधील संवादात सातत्य असावे. पोलिस विभाग कायमच उद्योजकांच्या पाठीशी आहे. तुम्ही तक्रारीवर ठाम राहून पुढे या, तक्रारीवर ठाम राहा, खंडणीखोरांना तडीपार करू, असे आश्वासन पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले. यावेळी उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त धनंजय पाटील, सुदर्शन पाटील, सुभाष भुजंग, संघटनेचे अध्यक्ष चेतन राऊत, उपाध्यक्ष मनीष अग्रवाल, सुरेश खिल्लारे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
आरटीआय कार्यकर्त्यांचा मनस्तापसंपूर्ण बैठकीत उद्योजकांनी आरटीआय कार्यकर्त्यांविषयी तक्रार केली. आरटीआय कार्यकर्ते, संघटनांचे आंदोलन, उपोषणासाठी मंडप व्यावसायिकदेखील ठरलेले असतात. खंडणीसाठी नकार देताच कंपनी, एमआयडीसी, प्रदूषण मंडळाच्या कार्यालयासमोर सेटअप उभारून आंदोलन सुरू होते. उद्योजकांना ब्लॅकमेल करतात, अशी खदखदच व्यक्त केली. कंपनीसमोर उपोषण, आंदोलनाला कुठलीच संघटना बसता कामा नये, असे आदेशच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी बैठकीतच सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षकांना दिले.
वाहतुकीचा प्रश्न गंभीर-मसिआच्या संपूर्ण बैठकीत उद्योजकांनी वाहतुकीच्या वाढत्या समस्यांवर मोठी चिंता व्यक्त केली.-चिकलठाणा औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या मुकुंदवाडी, धूत रुग्णालय चौक, वोक्खार्ड चौकात रोज सकाळी व सायंकाळी वाहतुकीचा खोळंबा होतो. केम्ब्रिज चौकात तीच परिस्थिती असते.-जालना रोड वाहतुकीसाठी अपुरा पडतो. बीड बायपासवर सिग्नल दुभाजक नाही. उड्डाणपुलावर अपघात वाढल्याची चिंता व्यक्त केली.
आम्हीच दहशतीत, महिला अधिकाऱ्याचीच तक्रारबैठकीला उपस्थित राज्य प्रदूषण मंडळाच्या महिला अधिकाऱ्याने आरटीआय कार्यकर्ते, संघटनांची दहशत विशद केली. कार्यालयात अश्लिल घोषणा देतात, अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत बोलून धमकावतात. उद्योजक काय आम्हीदेखील दहशतीत आहोत, अशी खंतच महिला अधिकाऱ्याने पोलिसांसमोर व्यक्त केली.