औरंगाबाद : विवाहितेचा विनयभंग करणारा व त्याचा जाब विचारताच डोक्यात गज मारुन जखमी करणारा दत्ता कौतिक निकम याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. मुळे यांनी एक वर्ष सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंड ठोठावला. तसेच फिर्यादीला १,५०० रुपये व तिच्या पतीला ८०० रुपये नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिले.
काय होती घटना
यासंबंधी ३५ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी दत्ता निकम (३१, रा. घृष्णेश्वर कॉलनी) याची पत्नी रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतली होती. तिला भेटण्यासाठी फिर्यादी महिला २० मे २०१७ रोजी आरोपीच्या घरी गेली. घरी कुणी नसल्याची संधी साधत आरोपीने तिचा विनयभंग केला. फिर्यादीने तिच्या पतीला हे सांगितले. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या पतीच्या डोक्यात गज मारुन आरोपीने जखमी केले. याबाबत हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
खटल्याच्या सुनावणीवेळी, सहाय्यक सरकारी वकील योगेश तुपे यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३५४ अन्वये ‘विनयभंगाच्या’ आरोपाखाली एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड आणि कलम ३२४ अन्वये ‘मारहाणी’च्या आरोपाखाली एक महिना सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला.