छत्रपती संभाजीनगर : शहरात 'हिट अँड रन' च्या घटना अद्यापही थांबलेल्या नसून मंगळवारी रात्री १०.३० वाजता एका अल्पवयीन मुलाने पादचारी महिलेला उडवून तिचे प्राण घेतले. एका नातेवाईकाची मोपेड घेऊन तो बजरंग चौक ते बळीराम पाटील चौकाच्या दिशेने सुसाट जात होता. यात सुवर्णा सुभाष पंडित (३९, रा. आयोध्यानगर) या निष्पाप महिलेचा मृत्यू झाला.
सुवर्णा इतरांच्या घरी धुणे-भांडे करुन कुटूंबाचा आर्थिक गाडा हाकत होत्या. काम आटोपून त्या रात्री १०.३० वाजता घरी परतत असताना लाल रंगाच्या मोपेड दुचाकीवरुन जाणाऱ्या (एम एच २० - एफबी-६२९६) अल्पवयीन चालकाने त्यांना पाठीमागून धडक दिली. दुचाकीचा वेग इतका होता की सुवर्णा दुरवर फेकल्या गेल्या. स्थानिकांनी धाव घेईपर्यंत चालकाने पोबारा केला. स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांचा खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, सिडको पोलिसांनी त्यानंतर २ वाजता अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत ठाण्यात बसवले होते.
पोलिसांनी गुन्हा दाखल करताना आरोपीच्या रकान्यामध्ये केवळ दुचाकी क्रमांकाचा उल्लेख केला. मात्र, चालक अल्पवयीन असला तरी त्याचे वडिल व त्याला दुचाकी देणाऱ्या दुचाकी मालकाला देखील यात मुख्य आरोपी का केले नाही, त्यांना आरोपी कधी करणार, असा संतप्त सवाल कुटूंबियांनी केला आहे.
रक्त तपासणी नाहीअल्पवयीन आरोपी सुसाट वेगात जात होता. त्यामुळे त्याची रक्ताची तपासणी करुन त्याने नशा केला होता का, याची तपासणी होणे गरजेचे हाेते. मात्र, सायंकाळ पर्यंत सिडको पोलिसांनी त्याची तपासणी केलेली नव्हती.