औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक व विधानसभेचे माजी सभापती, तसेच फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला.
बागडे हेच शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख नेते होते, तेच पडले. या पॅनलचे १४ उमेदवार विजयी झाल्यामुळे ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पॅनलचे बिनविरोध निवडून आलेले रोहयोमंत्री संदीपान भुमरे व प्रोसेसिंग मतदारसंघातून निवडून आलेले महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही ‘गड आला, पण सिंह गेला’ अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बिगर शेती मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलचे विद्यमान चेअरमन नितीन पाटील, आमदार सतीश चव्हाण व आमदार अंबादास दानवे हे निवडून आले. सतीश चव्हाण व अंबादास दानवे यांनी प्रथमच बँकेची निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना यश आले; परंतु ज्यांच्या नावाने पॅनल ओळखले जात होते ते बागडे मात्र पराभूत झाले.
शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे जगन्नाथ काळे व अपक्ष अभिषेक जैस्वाल यांनी या बिगर शेती मतदारसंघातून बाजी मारली.
एकूण वीस जागांपैकी १४ जागांवर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले ते असे :
शेतकी मतदारसंघातून पैठणमधून रोहयोमंत्री संदीपान भुमरे बिनविरोध, औरंगाबाद तालुक्यातून जावेद पटेल, फुलंब्रीतून सुहास शिरसाट, वैजापूरमधून अप्पासाहेब पाटील, सिल्लोडमधून अर्जुन गाढे, सोयगावमधून सुरेखा काळे, कन्नडमधून मनोज राठोड, अनुसूचित जाती मतदारसंघातून डॉ. सतीश गायकवाड, व्हीजेएनटी मतदारसंघातून दिनेश परदेशी, महिला राखीव मतदारसंघातून मंदा माने, प्रोसेसिंग मतदारसंघामधून अब्दुल सत्तार, बिगर शेती मतदारसंघातून नितीन पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे.
शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे शेती मतदारसंघातून खुलताबादहून किरण पाटील डोणगावकर बिनविरोध, गंगापूरमधून कृष्णा पाटील डोणगावकर, बिगर शेती मतदारसंघातून जगन्नाथ काळे, ओबीसी मतदारसंघातून देवयानी डोणगावकर, महिला राखीव मतदारसंघातून पार्वताबाई जाधव व अपक्ष अभिषेक जैस्वाल.