औरंगाबाद : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी आमदार हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दोन मंत्री संदीपन भुमरे ( Sandeepan Bhumare ) आणि अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांचे समर्थक रिंगणात आहेत. भुमरे गटाचे दिलीप निरफळ तर सत्तार गटाचे गोकुळ सिंग राजपूत यांच्यात यांच्यात रस्सीखेच आहे. दुध संघावर हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांच्या पॅनलचे वर्चस्व आहे. यात सेना, भाजप आणि कॉंग्रेस असे तिन्ही पक्षांचे नेते एकत्र आले आहेत.
यावेळीही दूध संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले. त्यासाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस या पक्षांचे जिल्ह्यातील नेते एकत्र आले. मात्र, त्यांना निम्मे यश आले आणि १४ पैकी ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर उर्वरित ७ जागांसाठी मतदार घेण्यात आले. सर्वपक्षीय पॅनल विरुद्ध अपक्ष अशी लढत यानिमित्ताने पाहावयास मिळाली. सर्वसाधारण मतदारसंघापैकी वैजापूर, फुलंब्री, कन्नड व औरंगाबाद या चार, तर महिला राखीव २ आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १ अशा एकूण ७ जागांसाठी मतदान झाले होते. २३ जानेवारीला झालेल्या मतमोजणीनंतर १४ पैक्की १४ जागांवर हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलने वर्चस्व सिद्ध केले. त्यानंतर आज अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. यावेळी आ. हरिभाऊ बागडे हे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.
दुध संघातील सदस्य असे नंदू काळे (पैठण), सविता अधाने (खुलताबाद), श्रीरंग साळवे (सिल्लोड), दिलीप निरफळ (गंगापूर), इंदूबाई सुरडकर (एससी राखीव), श्रीमती चोपडे (सोयगाव), राजेंद्र जैस्वाल (ओबीसी) हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर औरंगाबाद तालुका : हरिभाऊ बागडे, कन्नड तालुका : गोकुळसिंग राजपूत, फुलंब्री तालुका : संदीप बोरसे, वैजापूर तालका : कचरू डिके, महिला राखीव मतदारसंघातून शीलाबाई काकासाहेब कोळगे, अलका रमेश पाटील डोणगावकर, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागासवर्गीय राखीव प्रतिनिधी- पुंडिलकराव काजे हे निवडणुकीतून विजयी झाले आहेत.