छत्रपती संभाजी नगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या सुनील कावळे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांना संतप्त मराठा समाजाच्या रोशाला सामोरे जावे लागले. हरिभाऊ बागडे यांना संतप्त मराठा समाजाने स्मशानभूमीतून बाहेर काढले. तर तेथे आलेले आमदार नारायण कुचे यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवून परत पाठवले मराठा आरक्षणाची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे दिसत आहे.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे विशाल सभा झाली. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांनी घेतलेली मुदत अवघ्या चार दिवसांनंतर संपत आहे. अशा परिस्थितीत जागोजागी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना काल सुनील कावळे यांनी मुंबईत जाऊन आत्महत्या केली.
या घटनेचे तीव्र पडसाद आज शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्काराच्या वेळी दिसून आले. मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या आमदार हरिभाऊ बागडे यांच्यावर मराठा समाजातील संतप्त कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भरीमार करत, त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आलेल्या आमदार नारायण कुचे यांना मुकुंदवाडी स्मशानभूमी जवळ पोलिसांनी रोखले आणि परत पाठवले. यावेळी अमर रहे अमर रहे सुनील कावळे अमर रहे. अशी घोषणाबाजीही करण्यात आली.