फुलंब्री : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. 'सालडयाचे माझे दीड वर्ष बाकी आहेत, त्यानंतर सालगडी म्हणून राहयाचे नाही,' असे स्पष्ट संकेत सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी फुलंब्री येथील एका दीपावली मिलन कार्यक्रमात बोलताना दिले. हरिभाऊ यांच्या संकेतानंतर भाजप मधील इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पण, बागडे नानांच्या संमतीशिवाय तिकीट मिळणार नाही, हेही महत्वाचे आहे.
भारतीय जनता पार्टीमध्ये हरिभाऊ बागडे यांचे नाव आदराने घेतले जाते. राजकारणाची सुरुवात जनसंघापासून करणारे हरिभाऊ बागडे पहिल्यांदा औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून १९८५ मध्ये निवडून आले. यानंतर त्यांनी सलग सहा वेळा या मतदार संघात निवडून येण्याचा मान मिळविला. बागडे नाना यांच्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांच्यावर एकही आरोप झाला नाही. सुसंस्कृत आणि सरळ स्वभावाच्या हरिभाऊ बागडे यांनी अचानक सालडयाचे दीड वर्ष बाकी असून त्या नंतर सालगडी म्हणून राहयचे नाही, असे बोलून दाखविल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या नंतर कोण? यावर भाजपच्या गोटात चर्चा सुरू झाली आहे. येणारी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे, हे माझे मत असून पक्षाचे नाही. पक्षाकडून जो आदेश येईल, त्यानुसार पुढील काम करील, अशी प्रतिक्रिया आमदार हरिभाऊ बागडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
बागडे नाना नंतर कोण?फुलंब्री मतदार संघातून हरिभाऊ बागडे यांचे तिकीट कापणे हे कोणाच्या हातात नव्हते, हे सर्वाना माहित होते. जो पर्यंत हरिभाऊ बागडे स्वतः रिटायर होत नाही, तोपर्यंत काही खरे नाही, हे या मतदार संघातील इच्छुक असलेल्यांना माहित होते. आता बागडे यांनी रिटायर होण्याचे संकेत दिल्याने इच्छुकांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करणार आहेत. पण तिकीट मिळविण्यासाठी हरिभाऊ बागडे यांचा आशीर्वाद आवश्यक आहे. त्यांच्याशिवाय निवडून येणे सोपे नाही, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या दीड वर्षात त्यांना आपलेसे करून घेन्याकरिता चढाओढ पाहायला मिळणार आहे.
हरिभाऊ बागडे यांचा अल्पपरिचय हरिभाऊ बागडे हे पहिल्यांदा १९८५ मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातून आमदार झाले. त्या नंतर १९९० ,१९९५,२००० मध्ये सलग चार वेळा विधानसभेत निवडून गेले. ते २००० ते २००४ मध्ये राज्याचे पुरवठा व रोजगार हमी योजना मंत्री होते. त्या नंतर ते २००४ व २००९ मध्ये दोन वेळा पराभूत झाले. त्यांना डॉ. कल्याण काळे यांच्याकडून हार पत्करावी लागली. त्यांनी पुन्हा २०१४ व २०१९ मध्ये डॉ. कल्याण काळे यांचा पराभव करून निवडून आले. २०१४ ते २०१९ या कालवधीत ते विधानसभेचे अध्यक्ष होते. एकाच विधानसभा मतदार संघातून ते ६ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहे.