करमाड : कुठलीही संमती न घेता महापारेषण कंपनीच्या वतीने टाकण्यात येणाºया अतिउच्च दाबाच्या वीज वाहिनीमुळे डाळिंब व मोसंबी झाडांचे नुकसान झाले आहे. संबंधित कंपनीचे अभियंता धमक्या देत असल्याची तक्रार शेतकरी बद्री अण्णासाहेब पुंगळे या शेतकºयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, माझी जमीन औरंगाबाद तालुक्यातील ढवळापुरी येथे गट क्र.१६३ मध्ये असून, त्यामध्ये मोसंबी व डाळिंबाची फळबाग आहे. आमची कुठलीही समंती नसताना तसेच हे प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्या न्याय परवानगीत असून, त्याचा अजूनपर्यंत निर्णय झाला नाही.
परंतु महापारेषण कंपनीतर्फे वाळूज-भुसावळ (दीपनगर) या ४०० के. व्ही. अतिउच्च दाबाची वाहिनी टाकत असताना डाळिंब व मोसंबी बागेचे नुकसान झाले आहे. यावेळी आम्ही त्यांना विरोध केला असता कंपनीच्या अभियंत्यांनी पोलीस बंदोबस्त मागवून आम्हाला करमाड पोलीस ठाण्यात आणून बसवून ठेवले. त्यानंतर त्यांनी टॉवर वरील तार ओढली. यावेळी आमची काही जीवित हानी झाल्यास याला कंपनी जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.