लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खा. चंद्रकांत खैरे यांच्यासोबत असलेल्या वादामुळे चर्चेत असलेले शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव यांना तीन वर्षांत पहिल्यांदाच मंगळवारी मातोश्रीवर प्रवेश मिळाला आहे. पालकमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मध्यस्थीने ते मातोश्रीवर गेले. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर गा-हाणे मांडले. पक्षप्रमुखांनी त्यांचे ऐकून घेत तयारीला लागण्याचे आदेशही दिल्याची माहिती आहे. यामुळे खा.खैरे यांना एकप्रकारे शह दिल्याचे स्पष्ट झाले आहे.आ. जाधव यांनी यासंदर्भात सांगितले, ३ वर्षांनंतर पहिल्यांदाच मातोश्रीवर प्रवेश मिळाला. पक्षाबाबत माझे काहीही दुमत नाही. खा.खैरे यांच्याबाबत वाद असल्याचे पक्षप्रमुखांच्या कानावर घातले. त्यांनी सर्व ऐकून घेतल्यामुळे माझे समाधान झाले. पुढच्या महिन्यात ते कन्नडमध्ये एका कार्यक्रमाला येणार आहेत, असा शब्द त्यांनी दिला.पालकमंत्री कदम म्हणाले, राज्यमंत्री खोतकर त्यांना घेऊन आले होते. खैरे व त्यांच्यातील वाद मिटला नाही; परंतु जाधव यांना तयारीला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.राज्यमंत्री खोतकर म्हणाले, खैरे आमचे उपनेते आहेत. जाधव व त्यांच्यात असलेले गरैसमज दूर झाले आहेत. पक्षाची बैठक होती, विभागातील सर्व आमदार बैठकीला होते.
हर्षवर्धन जाधवांना ‘मातोश्री’वर प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 1:19 AM