छत्रपती संभाजीनगर : हर्सूल तलावातून दररोज १० एमएलडी पाणी घेण्याची यंत्रणा मनपाने मागील वर्षी उभी केली; मात्र जलशुद्धीकरण केंद्र छोटे पडत असल्यामुळे अतिरिक्त पाणी उचलणे शक्य होत नव्हते. त्यामुळे तातडीने जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूलाच नव्याने ७.५ द.ल.लि. क्षमतेचा फिल्टर प्लँट उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये जेरीमेशन फाउंटन, क्लॅरिफ्लॉक्युलेटर, फिल्टर हाऊस व पंप याचा समावेश असून, दिवाळीपूर्वी जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित होणार असून, जुन्या शहराला दहा एमएलडी पाणी मिळेल.
उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे हर्सूल तलावातून अतिरिक्त पाणी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मागील वर्षीच स्वतंत्र जलवाहिनी टाकून दिली. हर्सूलच्या जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी येत आहे. जलशुद्धीकरण केंद्रात ५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होऊ शकते. याच ठिकाणी दहा एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यास मंजुरी दिली. ७.५ द.ल.लि. क्षमतेच्या फिल्टर प्लँट उभारण्यासाठी ३ कोटी ४७ लाख ५७ हजार ५०० रुपये खर्च होणार आहेत. व्ही.आर.महाजन या कंत्राटदार एजन्सीमार्फत काम सुरू आहे.
पाणीपुरवठ्याची क्षमता वाढेलहर्सूलमध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या फिल्टर प्लँटअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. पाणीपुरवठ्यासाठी लागणारी यंत्रसामग्रीही मागविण्यात आली असून, या केंद्रामुळे जुन्या शहरातील १४ वॉर्डांना मुबलक प्रमाणात पाणी देता येईल. दररोज दहा एमएलडी पाणीपुरवठा या केंद्रातून करता येईल. सध्या जायकवाडी ते नक्षत्रवाडी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली जात असल्यामुळे किमान ८० एमएलडी पाणी शहरात येईल. त्यामुळे उन्हाळ्यात शहराला एक दिवसाआड पाणी देता येणार आहे.