छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. २०२४ चा उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून मनपाने जटवाडा रोडवर हर्सूल तलावाजवळ साडेतीन कोटी रुपये खर्च करून नवीन जलशुद्धिकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. दिवाळीपूर्वी हे काम पूर्ण होईल, असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात नवीन वर्षे सुरू झाले तरी काम पूर्ण झाले नाही. आता मनपाने १५ फेब्रुवारीचा मुहूर्त काढला आहे.
उन्हाळ्यात दरवर्षी जुन्या आणि नवीन शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे हर्सूल तलावातून अतिरिक्त पाणी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मागील वर्षीच स्वतंत्र जलवाहिनी सुद्धा टाकून दिली. हर्सूलच्या जलशुद्धिकरण केंद्रात हे पाणी येत आहे. जलशुद्धिकरण केंद्रात ५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होऊ शकते. याच ठिकाणी १० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धिकरण केंद्र उभारण्यास तातडीने मंजुरी दिली. ७.५ दलघमी क्षमतेच्या फिल्टर प्लँट उभारण्यासाठी ३ कोटी ४७ लाख रुपये खर्च होणार आहेत. व्ही. आर. महाजन या कंत्राटदार एजन्सीमार्फत काम सुरू आहे. नवीन जलशुद्धिकरण केंद्रामुळे जुन्या शहरातील १४ वॉर्डांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल. दररोज १० एमएलडी पाणीपुरवठा या केंद्रातून करता येईल.
मागील वर्षीचा पाऊस, अवकाळी पावसामुळे हर्सूल तलावात मुबलक प्रमाणात पाणी आहे. मे किंवा जून महिन्यापर्यंत पुरेल एवढे पाणी सध्या तलावात आहे. नवीन जलशुद्धिकरण केंद्र उभारणीस बराच विलंब होत आहे. सर्व काम आरसीसीत असल्याने विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आठ महिन्यांत हे केंद्र पूर्णपणे तयार होणे अपेक्षित होते. आता मनपाने कंत्राटदाराला १५ फेब्रुवारीची डेडलाईन दिली आहे. त्यापूर्वी टेस्टिंग होणे आवश्यक आहे.
छोटी-छोटी कामे बरीच शिल्लकइनलेट चेंबर, चॅनल फ्लश मिक्सर, वॉटरपंपचे स्लॅब आदी अनेक गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. ही कामे लवकरात लवकर व्हावीत यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. १५ फेब्रुवारीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काम सुद्धा केले जात आहे. याला विलंब झाला तरी दोन चार दिवस मागे पुढे होऊ शकते.- के. एम. फालक,कार्यकारी अभियंता, मनपा.