कन्नड : ‘भविष्य आपुले आपल्या हाती घडवू’ क्रांती गीतामधल्या या ओळी सार्थ ठरवित आहे तालुक्यातील हस्ता ग्रामपंचायत. कोरोनामुळे माणसांमधली नाती तुटत आहेत. कोरोनाची बाधा झाली की जवळचेही पारखे होतात. अशावेळी रुग्णांना मानसिक आधाराची गरज असते.
तर दुसरीकडे गृह विलगीकरण केलेले रुग्ण ठरवून दिलेल्या कालावधीत घरातच थांबतील आणि विलगीकरणाच्या नियमांचे पालन करतील याबाबत खात्री देता येत नाही. परिणामी हे रुग्ण सुपर स्प्रेडर ठरून कुटुंबाच्या आणि गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे या प्रकाराला प्रतिबंध व्हावा आणि गावातील कोरोना संसर्गाला आळा बसावा या उद्देशाने ग्रामपंचायतीने मंगल कार्यालयात महिला विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. अशाप्रकारचा कक्ष सुरू करणारी तालुक्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत आहे.
कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी शासकीय विलगीकरण कक्षही अपुरे पडू लागल्याने लक्षणे नसलेले तसेच जुनाट आजार नसलेल्या ५० वर्षांच्या आतील रुग्णांना गोळ्यांचा डोस देऊन होम क्वारंटाईन (गृह विलगीकरणात ) राहण्याचा सल्ला दिला जात आहे. यासाठी बाधित रुग्णांकडून हमीपत्र घेतले जात आहे. वास्तविक गृहविलगीकरणासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करणे आवश्यक असतांनाही अशी खात्री केली जात नाही. तसेच हे रुग्ण गृहविलगीकरणात न थांबता सर्रास वावरत असल्याने कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे.
परिणामी लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचा इतरांशी संपर्क तोडणे हा उद्देश ठेवून हस्ता ग्रामपंचायतीने प्रायोगिक तत्त्वावर विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. या सुविधा होमक्वारंटाईन केलेल्या महिला रुग्णाकडे व्यवस्था नसलेल्यानी स्वतः खाट व कपडे घेऊन विलगीकरण कक्षात यावे. ग्रामपंचायतीच्यावतीने अन्य सुविधा पुरविल्या जातील. जेवण, नाश्ता, चहा हे रुग्णाने घरूनच मागवायचे आहे. आरोग्य विभागाच्या नियमानुसार ठरवून दिलेल्या कालावधीत रुग्णाने विलगीकरण कक्षात थांबायचे आहे. रुग्णांचे ऑक्सिजन व तापमान आशा कार्यकर्ती दररोज घेते. तर एक दिवसाआड आरोग्यसेविका कक्षास भेट देऊन गोळ्या वाटप करते. काही अडचण असल्यास त्वरित सोडविली जाते. तर गरज पडल्यास पुरुष रुग्णांसाठी शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येईल, असे सरपंच वंदना निळ यांनी सांगितले.
कोट :
विलगीकरण कक्षातील रुग्णांच्या सुरक्षिततेच्या जबाबदारीसाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. महिला कक्षाची जबाबदारी अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती यांच्यावर तर पुरुष कक्षाची जबाबदारी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली.
- जी. डी. चव्हाण, ग्रामसेवक.
कोट :
प्रत्येक ग्रामपंचायतीने असे विलगीकरण सुरू करणे ही काळाची गरज आहे. अनुचित प्रकार घडून कक्षातील रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये यासाठी गावातील जबाबदार नागरिकांची समिती स्थापन करावी. तसा अहवाल ग्रामपंचायतीने तालुका आरोग्याधिकारी व तहसीलदार यांना देणे आवश्यक आहे.
- संजय वारकड, तहसीलदार, कन्नड.
190421\suresh ramrao chavan_img-20210419-wa0015_1.jpg
विलगीकरण कक्ष रेडी