औरंगाबाद : गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रस्त्याच्या दुतर्फा धोकादायकपणे हातागाड्या उभ्या करून फळे, भाजीपाला विक णे सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. हे हॉकर्स दुकानदारांना जिवे मारण्याच्या धमक्या देत मारहाण करीत असल्याचे समोर आले. दुकानासमोरील हातगाडी काढण्याचे सांगणाऱ्या दुकानदाराला रविवारी (दि.३) रात्री एका फळविक्रेत्याने बेदम मारहाण केली. त्रस्त व्यापाऱ्यांनी एकत्र येत याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली.
गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रस्त्यावर अनेक वर्षांपासून सुमारे दोनशेहून अधिक भाजीपाला विक्रेते धंदा करतात. रस्त्यावरील हे हॉकर्स स्थानिक व्यापाऱ्यांसोबतच वाहतुकीला अडचण निर्माण करीत असतात. रस्त्यावर उभ्या हातगाडीसमोरच ग्राहक त्यांची वाहने उभी करून माल खरेदी करतात. यामुळे गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होते. विशेषत: एखादा सण असेल तर रस्त्यावरील हॉकर्स आणि ग्राहकांची संख्या प्रचंड वाढते. परिणामी, वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते.
महाशिवरात्रीनिमित्त सोमवारी गजानन महाराज मंदिर चौकापासून पुंडलिकनगर रस्त्यावर हॉकर्सची संख्या वाढली होती. यशवंत थोरात यांच्या दुकानासमोर हातगाडी लावणाऱ्या फळविक्रेता काशीद नावाच्या तरुणाला त्यांनी रस्त्यावरून हातगाडी बाजूला घेण्याचे सांगितले. तेव्हा ‘त्याने हा रस्ता तुझ्या बापाचा आहे का, तुझे दुकान तेथे आहे’, असे म्हणून गळा पकडून खाली पाडले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींनी हे भांडण सोडविले. हॉकर्स काशीदचे अन्य साथीदारही त्याच्या बाजूने उभे राहिले आणि तेथील व्यापाऱ्यांना धमकावू लागले. अशाच प्रकारचा अनुभव साजन जैन या व्यापाऱ्याला काही दिवसांपूर्वी आला. माझ्या दुकानासमोरील हातगाडी काढ, असे त्यांनी एका हॉकर्सला सांगताच त्याने जैन यांना शिवीगाळ करीत धमकावल्याचे त्यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले.
कारवाईनंतर तासाभरात हॉकर्स रस्त्यावरवाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या पुंडलिकनगर रस्त्यावरील फळे, भाजीपाला विक्री करणाऱ्या हातगाडीचालकांवर शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक भारत काकडे आणि कर्मचाऱ्यांनी हातात दंडुका घेऊन रस्त्यावरून हुसकावून लावले. मात्र, या कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. पोलीस तेथून जाताच तासाभरात सर्व हॉकर्सनी पुन्हा रस्त्यावर ठाण मांडून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली. गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रस्त्यावरील हॉकर्समुळे रस्त्यावर कोंडी झाल्याचे कळताच शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक भारत काकडे आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेदरम्यान कारवाई करीत हॉकर्सना तेथून हुसकावून लावले. विशेष म्हणजे गजानन महाराज मंदिर चौैकात शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी कायम कर्तव्यावर असतात. असे असले तरी ते केवळ चौकातच वाहतूक नियमन करीत असतात. त्यांच्याकडून पुंडलिकनगर रस्त्यावरील हॉकर्सवर कारवाई होत नसल्याने या रस्त्यावरील हॉकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कारवाई करून वाहतूक शाखेचे अधिकारी परतातच हॉकर्सनी पुन्हा रस्त्यावर हातगाड्या उभ्या केल्या.
व्यापारी महासंघाची कारवाईची मागणी गजानन महाराज व्यापारी महासंघाने ४ मार्च रोजी पुंडलिकनगर पोलिसांना एक निवेदन देऊन दादागिरी करणारे हातगाडीचालक आणि दारुड्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. परिसरात दोन मंदिरे, पाच रुग्णालये, दोन शाळा, कोचिंग क्लासेस आहेत. यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी, महिला आणि वृद्धांची सतत वर्दळ असते. हे हॉकर्स आणि मद्यपी त्यांना त्रास देतात. शिवाय व्यापाऱ्यांना धमकावतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.