- श्यामकुमार पुरेसिल्लोड (जि. औरंगाबाद) : जगभरातील पर्यटकांच्या आकर्षण आणि कुतूहलाचा विषय असलेल्या आणि अजिंठा लेण्यांच्या परिसरात अजरामर ठरलेल्या एका प्रेमकथेच्या नायिकेची समाधी अजून उपेक्षितच आहे. रॉबर्ट गिल या विख्यात चित्रकाराची प्रेमिका अशी इतिहासात ओळख असलेल्या ‘पारो’च्या समाधीवरील धूळ कधी झटकणार, असा प्रश्न इतिहासप्रेमींना पडला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पारोची समाधी दुर्लक्षित आहे. जगाला अजिंठा लेणीची माहिती देणाऱ्या इंग्रज अधिकारी रॉबर्ट गिल व आदिवासी कन्या असलेल्या पारोची प्रेमकथा सर्वश्रुत आहे. अजिंठ्यात पारोची समाधी रॉबर्ट गिलने बांधली असून, त्यावर तसा उल्लेख आहे. मात्र, अनेक वर्षांपासून राज्य पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक असलेल्या या समाधीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
पारो आणि गिल यांची प्रेमकथा१८ व्या शतकात अजिंठा लेणीच्या डोंगररांगांत पारो आणि रॉबर्ट गिल यांची प्रेमकथा बहरली. मेजर रॉबर्ट गिल मे १८४५ ला सुरक्षा जवानांसह अजिंठ्याला आले होते. अजिंठा येथील सैन्य प्रशिक्षण केंद्राच्या स्थानिक वैद्यकीय उपचार केंद्रात ते राहत होते. त्या ठिकाणी आज ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आहे. त्यासमोरील प्रवेशद्वारावर असलेल्या इमारतीत रॉबर्ट गिल अनेक वर्षे राहिले. त्याला स्थानिक लोक गिल टोक म्हणून ओळखतात. तेथेच त्यांनी अजिंठा लेणींची चित्रे काढून जगात प्रसिद्ध केली. अजिंठा येथील स्थानिक आदिवासी पारो नावाच्या तरुणीशी त्याची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. चित्रकलेच्या कामात पारो देश, धर्म, भाषा, सामाजिक बंधने झिडकारून रॉबर्ट गिलला मदत करायची. ११ वर्षांच्या सहवासानंतर पारोचा २३ मे १८५६ रोजी अजिंठा येथे आकस्मिक मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने रॉबर्ट गिलला प्रचंड दु:ख झाले. तिच्या प्रेमापोटी रॉबर्टने तिची समाधी अजिंठा येथील पोलिस ठाण्याच्या परिसरात बनविली व त्यावर ‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो, हू डाइड २३ मे १८५६’ अशा ओळी लिहिल्या आहेत.
लवकरच विकासकामाला सुरुवातगिल आणि पारोची प्रेमकहाणी येणाऱ्या तरुण पिढीला माहिती असावी यासाठी अजिंठा येथील पारोच्या समाधीचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. समाधीला जोडणारे रस्ते, स्मारकाची संरक्षक भिंत, मुख्य प्रवेश द्वार, पर्यटकांना प्रसाधनगृह, नव्याने विकसित करण्यात येतील आणि लवकरच या कामाला सुरुवात होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
पर्यटकांचा ओघ वाढेलदोन दशकांनंतर का होईना प्रशासनाला जाग आली. ऐतिहासिक पारोच्या समाधीच्या विकासकामानंतर अजिंठ्यात पर्यटकांचा ओघ वाढेल. स्थानिकांना यातून रोजगारनिर्मिती होईल.- विजय पगारे, स्थानिक इतिहास संशोधक, अजिंठा