छत्रपती संभाजीनगर : शहरात जी-२० च्या बैठकांमुळे सर्वत्र स्वच्छता करण्यात आलेली होती. पाचोडहून दुचाकीवर शहरात आलेल्या दोघांपैकी एकजण गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकताना पोलिसांनी पाहिले. त्यास पोलिसांनी हटकताच त्यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांनी दुचाकीसह त्यांना जवाहरनगर पोलिस ठाण्यात नेले. त्याठिकाणी दुचाकीची पाहणी केली असता, डिक्कीमध्ये छऱ्याचे पिस्टल आढळले. त्यामुळे दोघांसह पिस्टल मालकावर गुन्हा नोंदविण्यात आल्याचा प्रकार २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला.
रवी आसाराम दुर्वे (२८, रा. शिवाजीनगर, पाचोड), आकाश प्रकाश अहिरे (२२, रा. कल्याणनगर,पाचोड), प्रवीणकुमार राजेभोसले (रा. पाचोड) याचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीणकुमार राजेभाेसले हे कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरीला आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी शेतात रानडुकरांचा त्रास वाढल्यामुळे त्यांना भेडविण्यासाठी अडीच हजार रुपयांना एक छऱ्याची पिस्टल विकत घेतली होती. सोमवारी रात्री ते शेतात पिस्टल घेऊन गेले होते. परत येताना ती पिस्टल दुचाकीच्या डिक्कीतच राहिली. मंगळवारी त्यांचे मित्र रवी दुर्वे व आकाश अहिरे यांनी त्यांची दुचाकी घेऊन छत्रपती संभाजीनगर शहरात आले.
सेव्हन हिल परिसरातील जुने खरेदी विक्री वाहन बाजाराच्या ठिकाणी असताना रवी दुर्वे हा गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकत होता. त्यास उपस्थित पोलिसांनी थुंकल्यास दंड होईल, असे बजावले. तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीसह दोघांना जवाहरनगर पोलिस ठाण्यात आणले. त्याठिकाणी दुचाकीची झडती घेतली असता, त्यात पिस्टल आढळुन आले. तेव्हा पोलिसांनी दुचाकी, पिस्टल, मोबाईल असा ऐवज जप्त करीत या दोघांसह पिस्टलचा मालकावर गुन्हा नोंदवला. अधिक तपास निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रमेश राठोड करीत आहेत.