लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : फरार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर कुख्यात आरोपी सचिन ठकसेन काळे याने तलवार उगारल्याची थरारक घटना सोमवारी सकाळी वाळूज एमआयडीसीत घडली. या कुख्यात आरोपीवर पोलिसांनी बंदूक रोखल्याने त्याने शरणागती पत्करली.न्यायालयात खटला सुरू असताना हजर न राहणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. कुख्यात आरोपी विठ्ठल ऊर्फ राजूमहादू काळे ऊर्फ सचिन ठकसेन काळे व इतर दोन आरोपींचा शोध पोलीस पथक घेत होते.सोमवारी गुप्त बातमीदाराने कुख्यात सचिन काळे वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात फिरत असल्याची माहिती दिली होती. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार लक्ष्मण उंबरे, पोहेकॉ. जºहाड, पोकॉ. गोरे, चालक शिनगारे आदींच्या पथकाने कामगार चौकात सापळा रचला होता. पोलीस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच आरोपी सचिन काळे वाहनतळावर उभ्या असलेल्या एका ट्रकच्या आडोशाला जाऊन लपला. कुख्यात सचिन काळे हा ट्रकमागे लपल्याचे दिसतात पोलीस पथकाने या परिसराला चोहोबाजूने घेरले.कामगार चौकातील वाहनतळात पोलीस आपल्याला पकडण्यासाठी येत असल्याचे लक्षात येताच ट्रकमागे लपलेल्या सचिन काळे याने शर्टाच्या पाठीमागील बाजूस लपवून ठेवलेली धारदार तलवार बाहेर काढली. ही तलवार पोलिसांच्या दिशेने उगारून मला पकडण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन सचिन काळे याने घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.आरोपीची शरणागतीकुख्यात सचिन काळे याने धारदार तलवार काढून पोलिसांना जिवे मारण्याची धमकी देत असताना प्रसंगावधान राखत फौजदार लक्ष्मण उंबरे यांनी स्वत:जवळील पिस्तूल बाहेर काढून सचिनकडे नेम धरला. सचिन काळे यास उद्देशून फौजदार उंबरे यांनी तुझ्याविरुद्ध अटक वॉरंट असून, जागेवरून हलल्यास गोळी झाडीन, असा सज्जड दम भरला. पिस्तूल रोखल्याचे व सर्व बाजूने घेरल्याचे लक्षात येताच सचिन काळे याने तलवार खाली टाकून शरणागती पत्करली. पोलीस पथकाने सचिन काळे यास पकडून ताब्यात घेतले असता त्याने जामिनावर सुटून आल्यानंतर तुम्हाला पाहून घेईन, अशी धमकी पोलिसांना दिली.आरोपीच्या ताब्यातून धारदार तलवार जप्त करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार कोपनार करीत आहेत.
त्याने उगारली तलवार; फौजदाराने रोखले पिस्तूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:37 AM