सिल्लोड : अवैध वाळू वाहतूक करीत असलेला हायवा सोयगाव तहसीलच्या पथकाने कारवाई करीत जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावला होता. मात्र, शुक्रवारी रात्री अज्ञातांनी तहसील कार्यालयाची संरक्षक भिंत व गेट तोडून हा हायवाच पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना शनिवारी सकाळी निदर्शनात आल्यानंतर सोयगाव शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोयगांव तालुक्यातील जरंडी-माळेगांव रस्त्यावर वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवाची माहिती तहसील पथकास गुरूवारी मिळाली होती. महसूल पथकाने सापळा रचून हायवा (क्र. एम. एच. ०३ सी. पी. ८८५२) व चार चार ब्रास वाळू जप्त करून तहसील कार्यालयात लावला होता. ही वाळू गुजरातमधून आणली जात असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी हायवा मालकास तीन लाख एकवीस हजारांचा दड भरण्याचे आदेश दिले होते.
गुरुवारी झालेल्या कारवाईनंतर हायवा तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला होता. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत हायवा तहसील आवारातच होता. मात्र, शुक्रवारी रात्रीतूनच काही अज्ञातांनी तहसील कार्यालयाची संरक्षत भिंत व गेट तोडून हायवा पळवून नेला. शनिवारी सकाळी कोतवाल मनोज आगे हे तहसील कार्यालयात गेले असता. शासकीय विश्रामगृहाच्या बाजूने असलेल्या लोखंडी गेट व संरक्षक भिंत तोडून हायवा चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांना कळविली. तर सोयगावात ही वार्ता पसरताच खळबळ उडाली. साधारणतः एक कि.मी. अंतरावर ट्रकमधील वाळू खाली टाकलेली आढळून आली. याप्रकरणी कोतवाल मनोज आगे याच्या फिर्यादीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष पाईकराव पुढील तपास करीत आहे. दरम्यान, हायवामधून रस्त्यावर टाकलेली वाळू पोलिसांनी तहसील कार्यालयात जमा केली आहे. याप्रकरणी सोयगाव पोलिसांचे एक पथक औरंगाबादच्या दिशेने तर दुसरे पथक गुजरातकडे गेले आहे.
वाळू तस्करांनी दिले प्रशासनाला आव्हान
सोयगाव तहसीलच्या वतीने गुरुवारी कारवाई करून अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त केला गेला. गुजरात राज्यातून सोयगावात वाळू आणली जात असल्याचे समोर आले. त्यामुळे वाळू तस्करीमध्ये सोयगावमधील काही राजकीय नेत्यांचा देखील हात असू शकतो, असे बोलले जात होते. ते समोर येऊ नये म्हणून वाळू तस्करांनी तहसील प्रशासनाला आव्हान देत जप्त केलेला हायवाच पळविला असावा, असे बोलले जात आहे.
100421\img-20210410-wa0362_1.jpg
सोयगाव तहसील कार्यालयाची संरक्षक भीत तोडून अज्ञातांनी जप्त केलेला हायवा पळविला.