औरंगाबाद : जालना रोडवरील अपना बाजार कॉम्प्लेक्समधील ठोले टायर्स दुकानाचे शटर उचकटून एका चोराने तब्बल ८० टायर चोरून नेले. त्यासाठी दोन रिक्षांचा वापर केला. मात्र रिक्षा सीसीटीव्हीत कैद झालेली असल्यामुळे २४ तासांच्या आत चोरटा मुद्देमालासह जेरबंद करण्यात जवाहरनगर पोलिसांना यश मिळाल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी दिली.
५ एप्रिलच्या रात्री ९ वाजेपासून ते ६ एप्रिलच्या सकाळपर्यंत नव्या कोऱ्या करकरीत चारचाकी गाड्यांचे ८० टायर चोरून नेण्यात आले होते. दुकानाचे मालक निर्मल माणिकचंद ढोले हे सकाळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना कळविण्यात आले. तब्बल ४ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या अनोख्या चोरीमुळे पोलीसही चक्रावून गेले. जवाहरनगरच्या गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक अजित दगडखैर यांच्या पथकाने दिवसभरात १०० ते १२५ सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यामध्ये दुकानातून बाहेर काढलेले टायर एका ऑटोरिक्षात (एमएच २८ - एबी ३३३८) घालून नेण्यात आल्याचे आढळले. या रिक्षातून रेल्वे स्थानक परिसरातील विट्स हॉटेलच्या जवळील रस्त्यावर टपरीच्या बाजूला हे टायर टाकण्यात आले. त्या ठिकाणाहून दुसऱ्या रिक्षातून (एमएच २० - सीटी २५०२) टायर वाळूज परिसरात नेण्यात आले.
दोन्ही रिक्षा चालकांना उपनिरीक्षक दगडखैर यांच्या पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हे टायर सलमान खान जाफर खान याने चाेरल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ते ८० टायर जप्त करीत आरोपीला अटक केली. ही कामगिरी प्रभारी निरीक्षक दिलीप गांगुर्डे, निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात एपीआय समाधान वाघ, पीएसआय दगडखैर, वसंत शेळके, शिवाजी घोरपडे, हवालदार अकोले, दंडवते, वानखेडे, जावेद पठाण, नागरे, गोरे आणि सोनवणे यांच्या पथकाने केली.
रिक्षाचालकांना दिले भाडेजालना रोडवरून वाळूज परिसरात ८० टायर घेऊन जाण्यासाठी मध्यरात्री दीड ते सकाळी साडेनऊ इतका वेळ लागला. दोन्ही रिक्षाचालकांना चोरट्याने आपलेच टायर असल्याची थाप मारली. रिक्षाचालकांना भाडे देण्यात आल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले.