औरंगाबाद : मुलगा बऱ्याच वेळाने घरी आला नाही म्हणून चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी फोन केला अन् अरे जेवायला ये ना, असे म्हटले. त्यावर मुलाने आता मी येणार नाही... बाय बाय... असे म्हणत स्वत:ला धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी संग्रामनगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली.फिरोज अमीर मुल्ला (३०, रा. नेहरूनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. फिरोज हा आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुलींसोबत नेहरूनगरात राहत होता. तो इलेक्ट्रिशियन होता. घरातच छोटे इलेक्ट्रिक सामान विक्री व दुरुस्तीचे त्याचे दुकान होते. काही तरी कारणावरून रागाच्या भरात मंगळवारी त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. आत्महत्येसाठी दुपारी तो घरातून बाहेर पडला. फिरत फिरत तो अखेर संग्रामनगरातील रेल्वेरुळावर पोहोचला. त्याचवेळी त्याच्या वडिलांचा फोन आला. वडिलांना आत्महत्या करत असल्याचे सांगतच त्याने रेल्वेसमोर उडी मारली. हादरलेल्या वडिलांनी जवाहरनगर ठाण्यातील आपल्या पोलीस मित्राला फिरोजच्या आलेल्या फोनविषयी सांगितले असता त्याला शोधण्यासाठी पोलीस मित्र निघणार तोच एका तरुणाने संग्रामनगरजवळ रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची खबर ठाण्यात येऊन धडकली. लगेच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. तेथे फिरोजचे प्रेत आढळून आले. फिरोजच्या आत्महत्येप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वडिलांना फोनवर ‘बाय बाय’ म्हणत त्याने घेतली आयुष्यातून ‘एक्झिट’
By admin | Published: July 27, 2016 12:30 AM