बीड : वडवणी येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी कारभार पाटोदा येथील विस्तार अधिकारी बी. के. नांदूरकर यांच्याकडे होता. हा पदभार बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा देत सीईओंनी त्यांना शनिवारी या पदावरून हटवून मूळ जागी पाटोदा येथे रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरले होते. मे २०१४ मध्ये नांदूरकर यांची प्रशासकीय कारणावरून पाटोदा येथे बदली झाली होती. सप्टेंबर २०१४ मध्ये वडवणी येथील तत्कालीन विस्तार अधिकारी तुकाराम पवार व बाबासाहेब उजगरे यांच्यात आपापसात बदली झाली. त्यानुसार उजगरे वडवणीला रूजू झाले. त्याआधी नांदूरकर हे अंशत: बदलाआधारे वडवणीला रूजू झाले होते. शेख नज्मा या विस्तार अधिकारी तेथे आधीपासून होत्या. दोन पदे मंजूर असताना तेथे तिघे रूजू झाले. त्यामुळे वेतनाचाही तिढा निर्माण झाला. बीईओ निवृत्त झाल्यानंतर नांदूरकर यांच्याकडे प्रभारी पदभार आला. यावर बाबासाहेब उजगरे यांनी आक्षेप घेतला. सीईओ नामदेव ननावरे यांनी नांदूरकर यांना पाटोदा येथे विस्तार अधिकारी म्हणून मूळ ठिकाणी रूजू होण्याचे आदेश दिले. मात्र, नांदूरकर रूजू झालेच नाहीत. त्यांचा वडवणी बीईओ पदाचा पदभार काढून पाटोदा येथे विस्तार अधिकारी या मूळ पदावर काम पाहण्यास सांगितले आहे. वडवणी बीईओ पदाचा प्रभारी पदभार बाबासाहेब उजगरे यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे शिक्षणाधिकारी (प्रा.) विक्रम सारूक म्हणाले. (प्रतिनिधी)