औरंगाबाद: १९ वर्षीय भाचीला विवाहासाठी मागणी घातल्याच्या कारणावरुन मुलीच्या मामाने सय्यद अखील हुसेन हमीद हुसेन उर्फ बाबा (४५,रा. नूर कॉलनी) या व्यवसायिकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. रोहिला गल्लीत रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास झालेल्या या खूनप्रकरणी मायलेक, मुलगा आणि मामाला सिटीचौक पोलिसांनी अटक केली.
मुख्य आरोपी शेख शफिक कादरी (३५,रा.पडेगाव), खमरुनिस्सा शेख हसन(४५), मुलगी शेख सना फिरदोस शेख हसन(१९) आणि मुलगा शेख तय्यब शेख हसन(२१.रा.सर्व रा. रोहिला गल्ली)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, मृत शेख अखील हे बाबा म्हणून सर्वत्र परिचित होते. शहरात त्यांचे सुमारे पाचशे ते सहाशे अनुयायी आहेत. ते दु:खी, पिडीतांच्या घरी जाऊन त्यांच्यावर हकीम म्हणून उपचार करीत.
आरोपी शफिक यास मुलबाळ नसल्याने तोही बाबा यांच्याकडे दोन वर्षापासून उपचार घेत होता. आरोपी शेख शफिक आणि खमरूनिस्सा हे भाऊ-बहिण आहेत. खमरूनिस्सा यांना एक तय्यब आणि सना हे अपत्य आहे. तिचा पती सवतीसोबत टाऊन हॉल येथे राहतो. खमरूनिस्साचे कुटुंबही अखीलबाबा यांचे अनुयायी असल्याने अखीलबाबा सतत खमरूनिस्सा यांच्या घरी येत असत. या दरम्यान अखीलबाबाची नजर सना हिचेवर पडली आणि त्यांनी काही दिवसापूर्वी खमरूनिस्सा यांच्यासमोर सनाच्या लग्नाचा विषय काढला. सना हिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ही बाब खमरूनिस्सा यांना खटकली. अखीलबाबा कडून झालेली मागणी सनाला सुद्धा आवडली नाही. तिने याविषयी तीव्र विरोध दर्शविला.
यानंतर खमरूनिस्सा यांनी अखीलबाबा यांना यापुढे आमच्या घरी येऊ नका,असे स्पष्ट बजावले. मात्र, त्यानंतर ते सतत त्यांच्या घरी चकरा मारत. सनाने ही बाब तिचा मामा शफीक यास सांगितली. शफिकला अखील बाबा चे वागणे आवडले नाही, त्याचा त्याला भयंकर राग आला. अखीलबाबा घरी आल्याचे कळवा,असे शफि कने सना आणि खमरूनिस्सा यांना सांगितले. रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अखील बाबा घरी आल्याची माहिती सना हिने शफिकला फोन करून सांगितले. शफिक लगेच घरी आला आणि खूर्चीवर बसलेल्या बाबावर त्याने धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांचा खून केला.