औरंगाबाद : पदव्युत्तरची परीक्षा देण्यासाठी पत्नीसह दुचाकीने जाणार्या दाम्पत्याला भरधाव ट्रक ने जोराची धडक दिली. या अपघातात पती जागीच ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा भीषण अपघात आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पडेगाव रोडवरील एका ढाब्याजवळ घडला.
विनोद शिवनाथ मानकापे (२६,रा. जातेगाव, ता. फुलंब्री, ह.मु.पुणे) असे मृताचे नाव आहे. तर कल्याणी विनोद मानकापे (२१) ही या अपघातात जखमी झाली. पोलिसांनी सांगितले की, विनोद हा पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरीला होता. पत्नी कल्याणीची खुलताबाद येथील एका महाविद्यालयात एम.एसस्सी.कॉम्प्युटर सायन्सची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेसाठी पत्नीला ने-आण करण्यासाठी विनोद मंगळवारी औरंगाबादेतील सासुरवाडीत आला होता.
सिडको एन-१३ येथील सासुरवाडीतून दोघे पती-पत्नी दुचाकीने शहरातून खुलताबादकडे परीक्षेसाठी जात होते. पडेगावजवळील एका ढाब्याजवळ एका ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात विनोद आणि कल्याणी हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल केले.
यावेळी अपघात विभागातील डॉक्टरांनी विनोद यास तपासून मृत घोषित केले. कल्याणीवर उपचार सुरू आहे. हा अपघात छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने छावणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कारवाईला सुरवात केली,अशी माहिती पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी दिली.
चिमुकल्याला सोडले घरीमानकापे दाम्पत्यांना सहा महिन्याचे मुल आहे. मात्र, परीक्षेसाठी दूरचा प्रवास व वातावरणात गारवा असल्याने त्यांनी चिमुकल्यास घरीच ठेवले होते.