छत्रपती संभाजीनगर : सहा दिवसांपूर्वी सिडको पोलिस व गुन्हे शाखेने पकडलेल्या चंद्रकांत सुधाकर दानवे (वय २२, रा. जाधववाडी) याने चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहे. सुरुवातीला एका घरफोडीची कबुली दिलेल्या चंद्रकांतने पोलिसांच्या पाहुणचारानंतर पाचपेक्षा अधिक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यात चोरून घरात लपविलेले ३६ ग्रॅम सोने, २३ ग्रॅम चांदी, लॅपटॉप व २५ हजार रोख रक्कम सिडको पोलिसांनी जप्त केली.
एन-८ मधील विनायक हाैसिंग सोसायटीत राहणारे शिवसागर राजू दाभाडे (२९) हे नाशिकला गेलेले असताना त्यांच्या घरी चोरी झाली होती. यात चोरांनी ७ लाख ३० हजार रोख आणि सोन्याचे दागिने लंपास केले. सिडको पोलिसांनी यात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत तो थांबलेल्या एका हॉटेल चालकाला ताब्यात घेतले हाेते. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच वेळी ठाण्यात जात त्या हॉटेल चालकाचा ताबा घेतला. त्यानंतर त्याच्या चौकशीतून ते चंद्रकांत पर्यंत पोहोचले. अटक करून त्याला पुन्हा सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले. उपायुक्त नवनीत काॅवत यांच्या सूचनेवरून निरीक्षक अतुल येरमे, उपनिरीक्षक निशिगंधा म्हस्के यांनी त्याची खोलवर चौकशी सुरू केली.
बी.एसस्सी ॲग्री पदवीधर असलेला चंद्रकांत हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे गमावून बसला होता. त्यात त्याच्यावर जवळपास तीन ते चार लाखांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी वेब सीरिजचा आदर्श घेऊन घरफोड्या सुरू केल्या. कंपनीची नोकरी साेडून तो नाईट शिफ्टला जात असल्याचा बनाव करून रात्रभर बॅगसह शहरात रेकी करीत फिरायचा. अशा त्याने सिडकोत चार, तर हर्सुलमध्ये एक घरफोडी केली. उपनिरीक्षक म्हस्के यांच्यासह अंमलदार सुभाष शेवाळे, लालखान पठाण, मंगेश पवार, प्रदीप दंडवते, विशाल सोनवणे, सहदेव साबळे यांनी या घरफोड्या उघडकीस आणत मुद्देमाल जप्त केला.