औरंगाबाद : लाॅकडाऊन काळात शहरातून झालेल्या दोन ट्रक चोरीचा गुन्हे शाखेने छडा लावत सराईत गुन्हेगारांचा गजाआड केले. ट्रकचोरी करून धुळे येथे भंगारात विक्री केल्याचे अटकेतील आरोपींनी कबुली दिली. या प्रकरणातील आणखी तिघे जण फरार असून, पुढील कारवाई सातारा पोलीस करत असल्याची माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली.
शहरातून २० दिवसांपूर्वी सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दहा टायरचे ट्रक चोरी झाले होते. त्यानंतर गुन्हे शाखेने साबेर शब्बीर पठाण (रा. जटवाडा रोड, अंबरहिल) व जाहेद शेख (रा. हुसेन कॉलनी गल्ली नं.८) यांच्यावर पाळत ठेवत साबेरला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने जाहेद शेखच्या मदतीने ट्रक चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही ट्रक धुळे येथील साबेर शेख कदीर (रा. तिरंगा चौक, धुळे) यांच्या मध्यस्थीने मोहंमद ओकील अब्दुल कय्युम अब्दुल वहाबसा, इलियास अहमद मोहमंद रईस (रा. अन्सार नगर धुळे) यांना एक ट्रक दीड लाख असे एकूण तीन लाख रुपयांमध्ये विक्री केल्याचे सांगितले.
गुन्हे शाखेने धुळ्यात जात इलियास अहमद याला ताब्यात घेतले. ट्रक तोडून भंगारमध्ये विक्री केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर साबेर शब्बीर पठाण, साबेर शेख कदीर, ईलीयास अहेमद मोहंमद रईस यांना अटक करून त्यांना पोलीस ठाणे सातारा यांच्या ताब्यात दिले. जाहेद शेख, मोहंमद ओकील, अब्दुल कय्युम अब्दुल वहाबसा हे फरार झाले आहेत. त्यांची पुढील कारवाई सातारा पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त मीना मकवाना, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे रवींद्र साळोखे, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, नंदकुमार भंडारे, किरण गावंडे, संजयसिंग राजपूत, बबन ईप्पर, नितीन देशमुख यांनी यशस्वी केली.