छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ गार्डनमध्ये गेलेल्या वृद्ध महिलेला आपण 'ईडी'चा अधिकारी असल्याची थाप मारून तुमच्या पतीच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतुन १० लाख रुपयांची मदत मिळवून देतो. त्यासाठी डॉक्टरची फिस आणि इतर खर्चासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी थाप मारून ठगाने वृद्धेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
अमोल विजय पाटील असे फसविणाऱ्या भामट्याचे नाव आहे. स्मिता देशपांडे (६७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १५ मे रोजी त्या सिद्धार्थ गार्डनमध्ये सकाळी ७ वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्याठिकाणी आरोपी अमोल पाटील याची ओळख झाली. त्याने फिर्यादीस मोबाईल नंबर देत आपण ईडीचा अधिकारी आहे. तुम्हाला गुढघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देतो. तसेच आपल्या पतीच्या ॲन्जिओप्लास्टीसाठीही निधी मिळवून देतो. दोन्ही शस्त्रक्रियेसाठी १० लाख रुपये मिळतील. जे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरचे शुल्क व इतर खर्चासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
५० हजार रुपये दिल्यानंतर २५ मे पर्यंत शस्त्रक्रियेसाठीची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल, असेही सांगितले. त्यानुसार फिर्यादीने १७ मे रोजीच रात्री ९ वाजता सुरुवातील १०० रुपये आरोपी अमोल पाटील याच्या बँक खात्यात फोन पे द्वारे पाठविले. त्यानंतर उर्वरित ४९ हजार ९०० रुपयेही खात्यात पाठविले. हे पैसे मिळाल्यानंतर २० मे पासून अमोल पाटील याचा मोबाईल नंबर बंद येत आहे. तसेच २५ मे पर्यंत पैसे बँक खात्यातील जमा होतील, ते आश्वासनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे फिर्यादी स्मिता देशपांडे यांनी आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार अमोल पाटील याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक छोटुराम ठुबे करीत आहेत.