वैजापूर : अर्ध्या रात्री प्रेयसीला भेटण्यासाठी आलेला १६ वर्षीय मुलगा आजोबा, वडील आणि चुलत्याच्या तावडीत सापडल्याने लाथा, बुक्के आणि काठीने मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील बोरसर येथे मंगळवारी उघडकीस आली असून, तिन्ही आरोपींना न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बोरसर येथील सचिन प्रभाकर काळे हा दहावीत शिकणारा विद्यार्थी २५ फेब्रुवारी रोजी पहाटेपासून घरातून बेपत्ता होता. त्याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याचे वडील प्रभाकर काळे यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात दिली होती. या पार्श्वभूमीवर बेपत्ता झालेल्या सचिनचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह २८ फेब्रुवारी रोजी भिवगाव शिवारात गव्हाच्या पिकात आढळला होता. मयत सचिन हा विनायकनगर येथील शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वर्गातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच सदरील मुलीच्या नातेवाइकांनी सचिनची हत्या केल्याची फिर्याद वैजापूर पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून दादासाहेब माधवराव जंगले, सुनील माधवराव जंगले व माधवराव कारभारी जंगले या तिघांना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.
तपासात आरोपींनी खुनाची कबुली दिली. त्यानुसार २४ फेब्रुवारी रोजी अर्ध्या रात्री मयत सचिन हा त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरात आला होता. प्रेयसीसोबत बोलतानाची कुणकुण तिचा आजोबा माधवराव कारभारी जंगले (वय ७१ वर्षे) यांना लागली. त्यांनी ही माहिती मुलगा दादासाहेब माधवराव जंगले (वय ४२) व सुनील माधवराव जंगले (वय ४४) यांना दिली. अर्ध्या रात्री आपल्या मुलीला भेटण्यासाठी हा मुलगा आपल्या घरात कसा काय आला? याचा राग अनावर झाल्याने या तिघांनीही सचिन काळे याला पकडून सुरुवातीला लाथा, बुक्क्यांनी त्यानंतर काठीने जबर मारहाण केली. यावेळी रक्तस्त्राव होऊन सचिनचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या तिघांनी सचिनचा मृतदेह घरापासून अर्धा किमी अंतरावरील भिवगाव शिवारातील शेतात गव्हाच्या पिकात फेकला. चार दिवसांनी मृतदेह सापडल्यानंतर घटनास्थळाच्या परिसरात पोलिसांना सचिनचा बूट, हेडफोन आढळला. ज्युली या श्वानाने महत्त्वाची भूमिका बजावत आरोपींचा माग काढला आणि आरोपी पोलिसांच्या गळाला लागले.
फोन समजत नाही, म्हणताच वाजली घंटीघटना घडल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील हे पथकासह चौकशीसाठी आरोपी जंगले यांच्या घरी गेले. त्यावेळी माधवराव जंगले हा घरात होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर माधवराव याने त्याची दोन मुले दादासाहेब व सुनील हे जेजुरीला गेल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला फोनवर संपर्क करण्यास सांगितले, तेव्हा माधवराव, मी खेडूत आहे. मला मोबाइल समजत नाही, असे म्हणाला. याच वेळी त्याच्या खिशातील मोबाइल वाजला. त्यानंतर मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच माधवराव खडाखडा बोलू लागला. सचिनचा खून आम्हीच केला असून, याप्रकरणात अटक होऊन नये म्हणून दादासाहेब व सुनील हे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी वैजापूरला गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी माधवराव व नंतर त्याच्या दोन मुलांना वैजापूर येथील एका हॉटेलमधून अटक केली. त्यानंतर त्यांना वैजापूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.