कन्नड - तालुक्यातील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल सुरेश देवराव शिंदे ( ३८ ) यास पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
तक्रारदार यांचे त्यांच्या मोठ्या भावाशी व भावजयीशी घरगुती वाद झाले. त्या वादामध्ये त्यांच्यावर देवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्यात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांना अटक न करण्यासाठी व वाढीव कलम न लावण्यासाठी पोहेकॉ सुरेश शिंदेने तक्रारदारास पंचवीस हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती ५ हजार रुपये लाच देण्याचे ठरले.
मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. पडताळणीनंतर एसीबी पथकाने आज सापळा लावला. दुपारी एक वाजेच्या सुमारास पाच हजार रुपये लाचेची रक्कम घेताना सुरेश शिंदेस पोलिसांनी ताब्यात घेतले. देवगाव (रंगारी) पोस्टे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधिक्षक विशाल खांबे, पोलिस उप अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, सहाय्यक सापळा अधिकारी पोनि हनुमंत वारे, पोना दिगंबर पाठक , पोअ केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागुल यांनी ही कारवाई केली.