आडूळ : कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया, प्रसूती झालेल्या महिलांच्या पोटातील द्रव्य तसेच प्रसूतीसाठी वापरण्यात येणारे खराब कपडे, नॅपकीन, वैद्यकीय साहित्यासह अन्य टाकाऊ वस्तूंची योग्य विल्हेवाट न लावता आडूळ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारातच हे साहित्य उघड्यावर फेकले जात असल्याचे समोर आले आहे. परिणामी आवारातच मोठी दुर्गंधी सुटली असून आरोग्य केंद्राला उर्किड्याचे स्वरूप आले आहे.
आडूळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पाच उपकेंद्र असून सुमारे ३५ गावांतील नागरिकांचे आरोग्य त्यावर अवलंबून आहे. या परिसरातील महिला प्रसूती/कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया येथे केल्या जातात; परंतु प्रसूती झालेल्या महिलांच्या पोटातील द्रव्य, प्रसूतीपूर्व कपड्यांची योग्य प्रकारे (खाली जमिनीत भूगर्भात सिमेंटच्या हौदात) विल्हेवाट न लावता चक्क प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भिंतीलगत उघड्यावरच सदरील साहित्य कर्मचारी फेकून देत आहेत. परिणामी, येथे दुर्गंधी पसरल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार या वस्तू उघड्यावर न टाकता खाली जमिनीत भूगर्भात असलेल्या सेफ्टी टँकमध्ये टाकून त्या नष्ट कराव्या लागतात; परंतु ही कोणतीही दक्षता या ठिकाणी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या आवारात कुत्रे, डुकरांचा मुक्त संचार असतो. हा गंभीर प्रकार आरोग्य विभाग थांबविणार का, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.
----
पिण्यास पाणीदेखील मिळेना
प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना पिण्यासाठी पाणी नसल्याने रुग्णांना बाहेर हॉटेल किंवा इतर ठिकाणावरून विकत घेऊन पाणी आणावे लागते. रात्री अपरात्री वीजपुरवठा खंडित झाला तर दाखल रुग्णांना अंधारातच रात्र जागून काढावी लागते. पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर मशीन लावली आहे; परंतु वॉटर फिल्टर मशीनमध्ये पाणीच टाकले जात नसल्याने ती शोभेची वस्तू बनली आहे.
----
रुग्ण कल्याण समिती फक्त कागदावरच
प्राथमिक आरोग्य केंद्राचे नियोजन व देखभालीवर लक्ष ठेवण्यासाठी गाव पातळीवर रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्यात येते. ही समिती केंद्राच्या कारभारावर लक्ष ठेवते. मात्र, येथील समिती फक्त कागदावरच असून दोन वर्षांपासून एकदाही ही बैठक झाली नाही.
---
फोटो : आडूळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात प्रसूती झालेल्या महिलांच्या पोटातील द्रव्य व खराब कपडे चक्क उघड्यावर टाकले जात आहेत.