छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या आरोग्य केंद्रांकडे मागील चार दशकांपासून अजिबात लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे रुग्णही फिरकत नव्हते. मागील वर्षापासून ३९ आरोग्य केंद्रे, ५ रुग्णालयांमध्ये दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली. यापूर्वी आरोग्य केंद्रात ज्या औषधी कधीच मिळत नव्हत्या त्या आता रुग्णांना मोफत मिळत आहेत. पुढील काही दिवसांत ७ कोटींहून अधिक रक्कम खर्च करून सर्व आरोग्य केंद्रे हायटेक केली जात आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने घेतलेला हा खास आढावा.
कोरोना संसर्गानंतर महापालिकेचे आरोग्य केंद्र, रुग्णालये किती महत्त्वाचे आहेत, याची जाणीव प्रशासनाला झाली. त्यानंतर दिल्लीच्या धर्तीवर सर्व आरोग्य केंद्र तयार करण्याचा निर्णय झाला. अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद करण्यात आली. त्यानुसार सर्व ३९ आरोग्य केंद्र अद्ययावत करण्यासाठी निविदाही प्रसिद्ध झाल्या. वर्क ऑर्डर देणे बाकी आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करणे, हा प्रशासनाचा उद्देश आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील सर्व आरोग्य केंद्रे सुरू ठेवण्यात येतात. पडेगाव येथील ‘आपला दवाखाना’ उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळतोय.
का वाढली रुग्णसंख्या?जुलै २०२२ पासून काही महिने व्हायरल फिवरने रुग्ण त्रस्त होते. शिवाजीनगर, एन-८ रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सकाळी १५० ते २५० रुग्ण येत असत. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला डॉक्टर तपासून औषधी देत. रुग्णाला एक रुपयाचीही औषधे बाहेरून आणण्याची गरज पडत नाही. सर्वाधिक मागणी असलेल्या खोकल्याचे औषधही प्रत्येक सेंटरवर आता मिळत आहे. याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब रुग्णांनाही औषधी दिली जात असल्याचे निदर्शनास आले.
लवकरच या सुविधांची भरमहापालिकेच्या रुग्णालयांमध्ये भविष्यात छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया होतील. प्रसूती, नुकतेच जन्माला आलेल्या बाळाला काचेत ठेवण्यासाठी केअर युनिट, डायलिसिस युनिट, सोनोग्राफी, फिजीओथेरपी इ. सोयीसुविधा देण्यात येणार असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी नमूद केले.
एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ रुग्णवाढमहिना- रुग्णसंख्याएप्रिल- २०,८७७मे- २०, ४९९जून- २८,७५९जुलै- ३७,१४९ऑगस्ट- ४१, ९९८सप्टेंबर- ४६,०१६ऑक्टोबर- ३७,३६९नोव्हेंबर- ३७,६७२डिसेंबर- ४०,५०२जानेवारी- ३७,०७२फेब्रुवारी- ३६,०८५मार्च- ३६,००१