लोहारा : जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आयोजित विशेष आरोग्य सप्ताहास सोमवारी प्रारंभ झाला. या एकाच दिवशी ४८ गावात आरोग्य तपासणी करण्यासह जनजागृती मोहीम राबविण्यात आली.सप्ताहाच्या पहिल्या दिवशी लोहारा तालुक्यातील ४८ महसुली गावांचे २ हजार ६४७ विद्यार्थी आणि ८ हजार ४८४ ग्रामस्थांची कुष्ठरोगाबाबत तपासणी करण्यात आली. सास्तूर येथे सोमवारी ४९० जणांनी याचा लाभ घेतला. प्रारंभी आर. बी. जोशी यांनी ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी या दरम्यान चालणाऱ्या या सप्ताहातील उपक्रमांबाबत माहिती दिली. अच्युत अधटराव यांनी उपस्थितांना कुष्ठरोगा संबंधीची, तर डॉ. माले यांनी स्वच्छतेची शपथ दिली. या सप्ताहानिमित्त सास्तूर येथे विविध स्टॉल उभारण्यात आले आहेत. उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा कुष्ठरोग सहसंचालक डॉ. खडके, डॉ. फुलारी, उमरगा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास जाधव, स्पर्शचे प्रकल्प अधिकारी आर. बी. जोशी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. गोविंद साठे, मुरूमचे डॉ. वसंत बाबरे, सरपंच मयुरी चिमकुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
४८ गावांत झाली आरोग्य तपासणी
By admin | Published: January 31, 2017 12:05 AM