- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : आरोग्य विभागाने आगामी ७ दिवसांत म्हणजे २१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात होणारी एकूण कोरोनाची रुग्णसंख्या आणि त्यानुसार ओटू बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर गरज यांचा आढावा घेतला. तेव्हा जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही ३२ हजारांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर रुग्णसंख्येच्या तुलनेत सोयीसुविधांत औरंगाबाद ग्रीन झोनमध्ये असल्याचा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे.
औरंगाबादेत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. पाहता पाहता कोरोनाची रुग्णसंख्या सप्टेंबरच्या मध्यापर्यंत २८ हजारांवर गेली आहे. आगामी ७ दिवसांत ४ हजार रुग्णांची भर पडून एकूण रुग्णसंख्या ३२ हजार ३३२ वर पोहोचण्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत जवळपास २२ हजार रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत. दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. आॅक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर अपुरे पडत असल्याने रुग्णांची, नातेवाईकांची तारांबळ उडत आहे; परंतु आरोग्य विभागाने तयार केलेल्या अहवालानुसार रुग्णसंख्या वाढली तरी त्यानुसार सुविधा पुरेशा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे औरंगाबादेत परिस्थिती ग्रीन झोनमध्ये दर्शविण्यात आली आहे. याविषयी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी याविषयी बोलण्याचे नाकारत, हा अंतर्गत अहवाल असल्याचे नमूद केले.
व्हेंटिलेटर, ओटू बेड, आयसीयू बेडची स्थितीऔरंगाबाद जिल्ह्यात ३ हजार ९३ ओटू बेड, ७२५ आयसीयू बेड आणि ३७० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. तुलनेत वाढीव रुग्णसंख्येनुसार गरज असलेल्या आयसीयू बेडची संख्या १ हजार ११४, आयसीयू बेडची संख्या ३८१ आणि व्हेंटिलेटरची संख्या १९१ दर्शविण्यात आली आहे. उपलब्ध सुविधांच्या तुलनेत मागणी कमी राहणार असल्याने औरंगाबादला ग्रीन झोनमध्ये दर्शविले आहे.