छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) शाळांमध्ये होणारी आरोग्य तपासणी गोरगरीब बालकांसाठी संजीवनी ठरत आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ५ लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीमध्ये ७० हृदयविकार, तर १७९० दृष्टिदोष असलेली मुले आढळून आली होती. यंदा जुलैपासून मुलांच्या तपासणीला सुरुवात करण्याअगोदरच या कार्यक्रमांतर्गत ३८ पथकांची वाहनेच काढून घेण्यात आल्यामुळे मोहीम रखडली आहे.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत पथकांना जिल्हाभरातील शाळा-अंगणवाड्यांमध्ये जाऊन मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी राज्यस्तरावरून वाहने पुरविली जातात. सन २०१९-२० या वर्षात वाहन पुरवठा करण्यासाठी तीन वर्षांचा करार झाला होता. वर्षभरापूर्वीच हा करार संपुष्टात आला. नवीन करार होईपर्यंत त्या त्या जिल्ह्यातील पुरवठादारांनाच वाहने सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मार्च २०२३ पर्यंत ही वाहने सुरू होती. मात्र, भाडे परवडत नसल्यामुळे जिल्ह्यातील पुरवठादारांची सर्व ३८ वाहने काढून घेतली आहेत. आता जून-जुलैपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. दरवर्षीप्रमाणे शालेय मुले, तसेच अंगणवाड्यांतील बालकांच्या आरोग्य तपासणीला जुलै महिन्यात प्रारंभ केला जातो; पण वाहनेच उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी या पथकांनी शहर व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीला प्राधान्य दिले आहे. तूर्तास तरी ग्रामीण भागात जाण्यासाठी या पथकांना अडचणी येत आहेत.
जिल्ह्यात किती पथके कार्यरतराष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात ४० पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक पुरुष व एक महिला असे दोन वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका व औषध निर्माता यांचा समावेश आहे. काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे सध्या ३८ पथके कार्यरत आहेत.
मुलांची आरोग्य तपासणीया मोहिमेंतर्गत मुलांतील जन्मजात व्याधीचा शोध घेतला जातो. हृदयाला छेद असणे, ओठ-टाळू दुभंगलेले, खुबा सरकणे, जन्मजात श्रवणदोष, दृष्टिदोष, चर्मरोग, रक्ताचा ॲनिमिया अशा विविध ३२ व्याधींवर मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात.
मावळत्या वर्षात ६९ हृदयाच्या शस्त्रक्रियागेल्या वर्षी जिल्ह्यातील २ हजार ७९३ शाळांमधील ४ लाख ९१ हजार ७८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ७० मुलांना हृदयाचा दोष आढळून आला. त्यापैकी ६९ मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर १ हजार ७९० मुलांमध्ये दृष्टिदोष आढळला. यातील १ हजार ६८० मुलांना चष्मे वाटप करण्यात आले.