लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : तरोडा भागातील व्यंकटराव तरोडेकर हायस्कुल व लाल बहादुर शास्त्री प्राथमिक शाळेच्या परिसरात मृत जनावरे, जैविक कचरा टाकण्यात येत असल्याने या दुर्गंधीने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ या भागातील संबंधित दुकान मालकांना अनेक वेळेस सांगूनही ते शाळेलगतच कचरा टाकत होते़ त्यामुळे मनपाचे सहायक आयुक्त गुलाम सादेक यांनी गुरूवारी भाग्यनगर पोलीस ठाण्यात एका दुकान मालकाविरूद्ध तक्रार दिली़ शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच तरोडा भागातील कल्याणनगर येथील शाळेच्या परिसरात मागील अनेक दिवसापासून कचरा टाकण्यात येत आहे़ मुख्य रस्त्यावर मच्छी मार्केट, चिकन सेंटरचे दुकाने आहेत़ या कचऱ्यात मृत जनावरे व जैविक कचराही मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत आहे़ त्यामुळे या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर आहे़ शाळेच्या भिंती लगतच टाकलेल्या घाणीमुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता़ त्यामुळे मुख्याध्यापकांनी आयुक्तांना निवेदन देवून सदरील शाळा महापालिकेच्या इमारतीत भरविण्याचा निर्णय घेतला होता़ दरम्यान, सहायक आयुक्त गुलाम सादेक यांनी तातडीने शाळेच्या परिसरात औषधांची फवारणी करून व स्वच्छता केली़ मात्र काही लोकांनी पुन्हा त्या जागेत कचरा आणून टाकला़ त्यामुळे गुरूवारी डायमंड चिकन सेंटरच्या मालकाविरूद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ तसेच या परिसरात असलेल्या दुकान मालकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत़
जैविक कचऱ्याच्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: June 30, 2017 12:05 AM