विश्वनाथ काळे , कोळनूरगेल्या महिनाभरापासून कोळनूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका रजेवर असल्याने या उपकेंद्राला टाळेच लागले आहे. परिणामी, रुग्णांची हेळसांड होत असून, आर्थिक स्थिती चांगली असलेले रुग्ण खाजगीकडे धाव घेत असल्याचे पहावयास मिळत आहे. जळकोट तालुका हा डोंगरी आहे. त्यामुळे या तालुक्यात सुविधांची वाणवाच आहे. तालुक्यातील कोळनूर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्राअंतर्गत लाळी (बु.), लाळी (खु.), येवरी, मंगरुळ, बेळसांगवी, सोनवळा या गावांचा समावेश होतो. त्यामुळे या गावांतील रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होत असतात. या उपकेंद्रात एक आरोग्य सेवक पद, एक आरोग्य सेविका, कंत्राटी आरोग्य सेविका अशा तीन कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु, केवळ एका आरोग्य सेविकेवरच हे उपकेंद्र चालविण्यात येत आहे. गेल्या महिनाभरापासून या उपकेंद्रातील आरोग्य सेविका ह्या रजेवर आहेत. परिणामी, या उपकेंद्रास टाळेच ठोकण्यात आले आहे. कुलूपबंद उपकेंद्र असल्याने कोळनूरसह परिसरातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. कोळनूरचे उपकेंद्र वांजरवाडा येथील आरोग्य केंद्रात असले, तरी त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे या घटनेवरून पहावयास मिळते.गेल्या महिनाभरापासून रुग्णांची तपासणी, गृहभेटी यासह अन्य आरोग्या संदर्भातील सर्व सुविधा ठप्प झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी एक महिला प्रसुतीसाठी रात्री २ वाजेच्या सुमारास या उपकेंद्रात आली होती. या महिलेस हे उपकेंद्र बंद असल्याची माहिती नसल्याने तिला मोठा त्रास सहन करावा लागला. परिणामी, सदरील महिलेस प्रसुतीसाठी पाटोदा (बु.) येथील केंद्रात जावे लागले. रात्री-अपरात्री रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु, त्यांना सुविधाच मिळत नसल्याने गैरसोय होत आहे. गावात उपकेंद्र असतानाही ते बंद असल्याने नागरिक व रुग्णांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वरिष्ठांनी तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
आरोग्य उपकेंद्राला टाळे
By admin | Published: November 10, 2014 11:41 PM