औरंगाबाद : वर्षभरापूर्वी महाभयंकर अशा कोरोनाने प्रवेश केला आणि आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले. कोरोनाचे हे संकट अजूनही आ वासून उभेच आहे. आरोग्य यंत्रणा दिवसरात्र त्याविरुद्ध लढा देत आहे. हा लढा देताना कोरोना निदानाची व्यवस्था, रुग्णालयांतील ऑक्सिजन पुरवठ्याची यंत्रणा, नवे व्हेंटिलेटर, नवे रुग्णालय, लसी साठविण्याची व्यवस्था, अशा गोष्टींतून गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाटीतील रेंगाळलेली सुपर स्पेशालिटी ब्लाॅकची इमारत युद्धपातळीवर रुग्णसेवेसाठी सज्ज झाली. सध्या येथे कोरोना रुग्णांवर उपचार होत आहे. सर्जिकल इमारतीतील अनेक वर्षांपासूनचा सेंट्रल ऑक्सिजनचा प्रश्न मार्गी लागला. घाटीत तब्बल ९ लिक्विड ऑक्सिजनचे टँक उभे राहिले. त्यामुळे सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरविण्याची कसरत थांबली. सुपर स्पेशालिटी, मेडिसीन विभागाच्या इमारतीपाठोपाठ सर्जिकल इमारतीत ऑक्सिजन खाटा सज्ज आहे. जिल्हा रुग्णालयातही ऑक्सिजन टँकची उभारणी सुरु आहे.
गतवर्षी केंद्र सरकारकडून ६० व्हेंटिलेटर मिळाले. राज्य सरकारकडूनही नवे व्हेंटिलटर प्राप्त झाले. आरोग्य उपसंचालक कार्यालात कोल्ड स्टोअरजेद्वारे कोरोना लस साठविण्याची सुविधा झाली. छावणीतही या सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनामुळे केंद्र आणि राज्य सरकारनेही अर्थसंकल्पात आरोग्याला प्राधान्य क्रम दिला. शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय डाॅ. नीता पाडळकर यांनी कोरोनाशी लढा देताना आरोग्य यंत्रणा सक्षम राहील, यासाठी दिवसरात्र प्रयत्नांची पराकाष्टा केली.
---
कोरोनाचे निदान शहरातच झाले शक्य
गतवर्षी मार्चच्या प्रारंभी कोरोनाचे संशयीत आढळून येत होत होते, तेव्हा त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील ‘एनआयव्ही’ला पाठवावे लागत असे. तेथून अहवाल येण्यास दोन ते तीन दिवस जात असे. घाटीत २९ मार्च २०२० रोजी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र कार्यान्वित झाले आणि शहरातच काेरोनाची तपासणी सुविधा सुरू झाली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही कोरोना तपासणीची प्रयोगशाळा सुरू झाली.
-----
कोरोनात मेल्ट्राॅनचा आधार, नंतर होणार संसर्गजन्य रुग्णालय
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर युद्धपातळीवर मेल्ट्राॅनच्या इमारतीत युद्धपातळीवर कोरोना उपचाराची व्यवस्था उभारण्यात आली. गेल्या वर्षभरात याठिकाणी शेकडो रुग्णांवर उपचार करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर याठिकाणी विशेष संसर्गजन्य रुग्णालय करण्यात येणार आहे.
---
वर्षभरात अनेक आरोग्य सुविधा
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सीएसआर यांच्या माध्यमातून नवीन व्हेंटिलेटर मिळाले. ऑक्सिजन सिलिंडरची संख्या वाढली. रुग्णालयांत सेंट्रल ऑक्सिजन लाइन टाकून घेण्यात आल्या. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांत लिक्विड ऑक्सिजन टँक उभे करण्यात आले. कोरोना लसी साठविण्याची सुविधा करण्यात आली.
-डाॅ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक