औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरातील हमालवाडा रोडवरील अत्यंत प्रशस्त असलेल्या अमृत साई प्लाझा सोसायटीमध्ये मागील चार दिवसांमध्ये तब्बल ४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. महापालिकेची आरोग्य यंत्रणा या घटनेमुळे हादरली असून, दररोज या भागात ४० ते ५० नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यात येत आहेत. महापालिकेने या भागात व्यापक उपाययोजना केल्या नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे.
सिल्कमिल कॉलनी परिसराला लागून असलेल्या अमृत साई प्लाझा सोसायटीमध्ये तीन वेगवेगळ्या विंग आहेत. प्रत्येक विंगला ए, बी, सी असे नाव देण्यात आले आहे. सोसायटीमध्ये एकूण २५० कुटुंबे राहतात. ४ जुलै रोजी एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली. त्यांच्या संपर्कातील आणि परिसरातील रहिवाशांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये सोसायटीमधील १४ नागरिक पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या दिवशी १२ रुग्ण सापडले. तिसऱ्या दिवशी महापालिकेने व्यापक प्रमाणात स्वॅब घेतले असता २१ नागरिक पॉझिटिव्ह सापडले. आतापर्यंत ४९ नागरिक पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जास्तीत जास्त स्वॅब घेण्याचा प्रयत्नबुधवारी महापालिकेची मोबाईल टीम सकाळपासूनच जास्तीत जास्त स्वॅब घेण्याचा प्रयत्न करीत होती. महापालिका प्रशासनाने या भागात कोणत्याही व्यापक उपाययोजना केल्या नाहीत. मागील चार दिवसांत सोसायटीमध्ये निर्जंतुकीकरणसुद्धा केलेले नाही. जनजागृतीसाठी कोणीही फिरकले नाही. पत्रे लावून परिसर सील केला नाही. एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने या भागाला भेट दिलेली नाही, असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. सोसायटीत आणि परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.