औरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुरक्षारक्षकांना मारहाण करणे, राजदंड पळविणे, महापौरांवर खुर्च्या भिरकावणाऱ्या तीन नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात यावे, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
बुधवारी या नगरसेवकांची सुनावणी नगरविकासमंत्री रणजित पाटील यांनी घेतली. पुढील सुनावणीपूर्वी महापालिकेला आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. महापालिकेने हिरवी झेंडी दाखविल्यास तिन्ही नगरसेवकांना अपात्र ठरविले जाईल. तिन्ही नगरसेवक एमआयएमचे आहेत. त्यातील एकाची मागील आठवड्यातच पक्षाने हकालपट्टी केली आहे.
१६ आॅक्टोबर २०१७ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावर जोरदार चर्चा सुरू होती. अचानक एमआयएमचे नगरसेवक अजीम अहेमद महापौरांच्या आसनासमोर आले. सुरक्षारक्षक बाजूला उभे होते. त्यांनी सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की करून ढकलून दिले. एमआयएमचेच सय्यद मतीन, शेख जफर यांनी चक्क राजदंड पळविला. गोंधळी नगरसेवक एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी प्लास्टिकच्या खुर्च्या चक्क महापौरांच्या अंगावर भिरकावल्या होत्या.
या प्रकरणात तिन्ही नगरसेवकांवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोषी नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी २५ आॅक्टोबर २०१७ रोजी राज्य शासनाकडे अहवालही पाठविण्यात आला होता. आता या प्रकरणाची पहिली सुनावणी बुधवारी मुंबईत घेण्यात आली. तिन्ही नगरसेवक सुनावणीस उपस्थित होते. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सुनावणी घेतली. पुढील सुनावणीस मनपाला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले. महापालिकेने तिघांना अपात्र ठरविण्यासाठी अहवाल दिल्यास शासनाकडून अंतिम कारवाई होईल. सुनावणीप्रसंगी उपायुक्त डी.पी. कुलकर्णी उपस्थित होते.
एमआयएमचे वेगळे प्रयत्ननगरसेवक सय्यद मतीन यांना अलीकडेच एमआयएम पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्यांना अपात्र ठरविण्यासाठीही पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाने फक्त मतीन यांच्यावर कारवाई केल्यास ते खंडपीठात धाव घेतील. शासनाला तिघांसंदर्भात निर्णय घ्यावा लागेल. तिघे अपात्र ठरल्यास एमआएम पक्षाला मोठा झटका बसणार आहे.