पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांच्याविरुद्धच्या याचिकेवर २३ जानेवारी रोजी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 06:50 PM2019-01-12T18:50:03+5:302019-01-12T18:50:15+5:30
राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या कुटुंबियांनी नियोजित चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याची जमीन स्वत:च्या नावे केल्याबाबत दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी शुक्रवारी (दि.११) सरकार पक्षाने न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाकडे वेळ मागून घेतला.
औरंगाबाद : राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या कुटुंबियांनी नियोजित चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याची जमीन स्वत:च्या नावे केल्याबाबत दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी शुक्रवारी (दि.११) सरकार पक्षाने न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाकडे वेळ मागून घेतला.
मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी खंडपीठात निवेदन केले की, या प्रकरणात चौकशी सुरू आहे, तसेच तक्रारकर्त्यासह इतरांचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती दिली. आता या याचिकेवर २३ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
बळीराम कडपे यांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फ त सदर याचिका दाखल केली आहे. त्यानुसार पाणीपुरवठा मंत्र्यांनी सन २००० मध्ये परतूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे चतुर्वेदेश्वर साखर कारखाना मर्यादित स्थापण्यासाठी मंठा आणि परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये समभागांच्या रूपात घेतले. या रकमेतून कारखान्याच्या नावे जमीन खरेदी केली. सदर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून लोणीकर यांचे नाव आहे, तर ७/१२ मध्ये सदर कारखान्याच्या नावाची नोंद घेण्यात आली; मात्र कारखाना सुरू झालाच नाही. दरम्यान, पाणीपुरवठा मंत्र्यांनी लोणी खुर्द येथील तलाठ्याकडे कारखान्याचे नाव ७/१२ वरून वगळण्यासाठी अर्ज दाखल केला. त्याआधारे कारखान्याचे नाव वगळून लोणीकर यांच्या, त्यांच्या मुलाच्या आणि नातवाच्या नावांची ७/१२ मध्ये नोंद घेण्यात आली. याविरुद्ध कडपे यांनी पोलीस, जिल्हा प्रशासन, साखर आयुक्त, आणि प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे दाद मागितली. कारवाई न झाल्याने त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. यापूर्वी खंडपीठाने राज्य शासन, गृहखात्याचे प्रधान सचिव, साखर आयुक्त, पुणे, प्रादेशिक सहसंचालक (साखर), औरंगाबाद, जालना जिल्हा पोलीस अधीक्षक, आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला होता.