छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही काळापासून हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) निधन होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः क्रिकेट खेळताना, डान्स करताना, व्यायाम/जिम करताना अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटनांचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता ताजी घटना छत्रपती संभाजीनगरमधून (Chh. Sambhajinagar) समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील एका जिममध्ये व्यायाम करत असताना शहरातील प्रसिद्ध व्यावसायिकाचा रविवार(दि.21) रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सीम्रन मोटरचे मालक कवलजीतसिंग बग्गा आपल्या सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे एरोबिक्स करत होते, यावेळी अचानक ते कोसळले आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. बग्गा खाली कोसळल्यानंतर त्यांचे सहकारी मदतीसाठी धावले आणि त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत खुप उशीर झाला होता.
ही मृत्यूची घटना जिममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, कोरोनानंतर जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक प्रसिद्ध लोकांचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला आहे. यामध्ये लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव, टीव्ही अभिनेता सिद्धार सूर्यवंशी, सागर पांडे, कन्नड अभिनेता पुनित राजकुमारसह अनेकांचा समावेश आहे.