औरंगाबाद : घराच्या शेजारी असलेल्या दुकानातून ५० रुपये चोरल्याचा महिलेने केलेल्या आरोपाने व्यथित होऊन १२ वर्षीय सूरज जनार्दन क्षीरसागर याने मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी उघडकीस आली. रेल्वेच्या धडकेने गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने समाजमन हेलावून गेले आहे.
शिवाजीनगर येथील कलावती चव्हाण शाळेत सूरज इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. आनंदनगर येथे जनार्दन क्षीरसागर यांच्या घराशेजारी सरला रत्नाकर धुमाळ यांचे दुकान आहे. गुरुवारी (१७ आॅक्टोबर) सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास सूरज बहीण श्रद्धासह (९) शाळेत गेला होता. त्यावेळी सरला शाळेत आल्या आणि त्यांनी सूरजबाबत विचारणा केली. आपल्या दुकानाच्या गल्ल्यातून त्याने पन्नास रुपये चोरल्याचा आरोप त्यांनी केला. ही बाब कळताच संवेदनशील मन असलेला सूरज शाळेतून निघून गेला. तेव्हा सरला आणि श्रद्धाने पाठलाग केला. मात्र, तो त्यांच्या हाती लागला नाही. त्यानंतर सरला यांनी जनार्दन यांना फोन करून सांगितले. जनार्दन हे सरला यांना त्यांच्या दुकानात जाऊन भेटले तेव्हा सूरज दुकानात आला होता आणि त्यानेच गल्ल्यातील पन्नास रुपये चोरल्याचा आरोप केला. त्यानंतर जनार्दन आणि अन्य नातेवाईकांनी त्याचा दिवसभर सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो त्यांना सापडला नाही.
दरम्यान, उद्विग्न झालेल्या सूरजने सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास रेल्वेसमोर उडी घेऊन मृत्यूला कवटाळले. शाळेच्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली. चोरीच्या आरोपाने व्यथित होऊन कोवळ्या मनाला यातना सहन न झाल्यानेच सूरजने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे या घटनेवरून दिसून येते. जनार्दन क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सरला रत्नाकर धुमाळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याविषयी सूरजच्या वडिलांनी १८ आॅक्टोबर रोजी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सरला धुमाळ यांनी सूरजवर पन्नास रुपये चोरीचा आरोप केल्याने अपमानित झाल्यामुळे आणि मारहाण होण्याच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याची तक्रार नोंदविल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.
परीक्षाही बुडाली अन् जीवनयात्रा संपविलीसध्या सूरजची सहामाही परीक्षा सुरू होती. गुरुवारी त्याचा पेपर होता. मात्र, चोरीचा आरोप करीत पकडून मारण्याच्या उद्देशाने सरला या शाळेत आल्याने सूरज निघून गेला व त्याची परीक्षाही बुडाली. शिक्षक आणि अन्य विद्यार्थ्यांसमोर चोरीचा आरोप झाल्याने तो अपमानित झाल्याने सूरजने मृत्यूला कवटाळल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला.