छत्रपती संभाजीनगर : धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करताना अवघ्या ३ सेकंदांत दोन महिलांचे प्राण बालंबाल वाचल्याची घटना रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. यातील एक महिला रेल्वे आणि प्लॅटफाॅर्मच्या मधील जागेत पडणार होती. मात्र, प्रवासी आणि लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे ती सुखरूप राहिली.
जनशताब्दी एक्स्प्रेसने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना सोडण्यासाठी काही नातेवाईक रेल्वे स्टेशनवर आले होते. सकाळी ९:२५ वाजता रेल्वे रवाना होत होती. नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेल्या दोन महिला बोगीत चढल्या होत्या. रेल्वे रवाना होत असल्याचे लक्षात येताच आधी एकीने बोगीच्या दारातून कशीबशी उडी घेतली. त्यात तिचा तोल जाऊन ती प्लॅटफाॅर्मवर पडली. त्यानंतर अवघ्या ३ सेकंदांत दुसऱ्या महिलेने धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिचाही तोल गेला. काही क्षणासाठी बोगीच्या दारात लटकत त्या खाली कोसळल्या.
रेल्वे आणि प्लॅटफाॅर्मच्या मधील जागेत महिला पडणार तोच गस्तीवरील लोहमार्ग पोलिस ठाण्याचे अंमलदार ज्ञानेश्वर क्षीरसागर आणि अश्रुबा गेजगे यांनी आणि काही प्रवाशांनी धाव घेत महिलेला बाजूला ओढले. त्यामुळे महिला थोडक्यात बचावली. लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद जोगदंड आणि सहायक पोलिस निरीक्षक गणेश दळवी यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेची प्रशंसा केली.
आत जाऊ नकाप्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्यांनी बोगीत जाता कामा नये. शिवाय प्लॅटफाॅर्मवरील पिवळ्या रंगाच्या परशीच्या मागे उभे राहावे. यातून अशा घटना टळतील, असे रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले.