छत्रपती संभाजीनगर : शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योगपतींचा लोकमतच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हृद्य सन्मान करण्यात आला.
हक्कापेक्षा कर्तव्याची रेषा मोठी ठेवा, असा हितोपदेश करीत राज्यपाल बागडे यांनी उपजतऐवजी पडीक जमिनीवर उद्योग विकसित व्हावेत. सरकारने तेथे विमानतळापासून सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही यावेळी केली.
या उद्योगपतींचा झाला सन्मान...नाथ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक-अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, आर. एल. स्टील्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र गुप्ता, ज्येष्ठ उद्योजक तथा ॲप्लाइड इनोव्हेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी ग्रुपचे अध्यक्ष राम भोगले, बागला ग्रुपचे चेअरमन ऋषी बागला, बडवे इंजिनिअरिंग लिमिटेडचे अध्यक्ष श्रीकांत बडवे, ज्येष्ठ उद्योगपती तथा पॅरासन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक शेखर देसरडा, ग्राइंडमास्टर्स मशीन्स प्रा. लि.च्या संचालक मोहिनी केळकर, ऋचा इंजिनिअरिंगचे उमेश दाशरथी, लक्ष्मी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन सुभाष नहार, ‘मनजीत कॉटन प्रा. लि.चे भूपेंद्रसिंग राजपाल व संमित राजपाल, एक्स्पर्ट ग्लोबल सोल्यूशन्स प्रा. लि.चे मुकुंद कुलकर्णी, काळे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काळे, अजित सीड्स प्रा. लि.चे (ASPL) व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे, लाइफलाइन मेडिकल डिव्हायसेस प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक डॉ. विनोद भाले, डॉ. विक्रांत भाले, विशाल भाले, तुबा फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. जावेद मुकर्रम, सलमान मुकर्रम, बिम्टा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद थोरात, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, ऑरिकचे प्रोजेक्ट मॅनेजर अरुणकुमार डुबे, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे (सीएमआयए) अध्यक्ष अर्पित सावे तसेच उत्सव माछर, अथर्वेश नंदावत, हर्ष जाजू, मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर(मसिआ) मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत, मनीष अग्रवाल, राजेश चौधरी यांचा यावेळी हद्य सन्मान करण्यात आला. यावेळी नंदकिशोर कागलीवाल, राम भोगले व श्रीकांत बडवे यांनी सत्काराला उत्तर दिले.
लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, त्या काळात वृत्तपत्र सुरू करणं धाडसाचं होतं. परंतु मराठवाड्यातील जनतेचे प्रेम, मिळालेला प्रतिसाद व पाठबळामुळे ते शक्य झाले. त्यामुळे मराठवाड्याच्या जनतेला मी प्रणाम करतो. स्व. जवाहरलाल दर्डा व बंधू विजय दर्डा यांनी त्यावेळी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करू शकलो, याचा मला आनंद आहे. लाखो वाचक, वितरक, जाहिरातदार आणि हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले. दर्डा परिवाराची तिसरी पिढी देवेंद्र, ऋषी आणि करण यांच्या हातात लोकमत असून ते उत्कृष्ट पद्धतीने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकमतने मराठवाड्याचा पुरुषार्थ जागवला....लोकमतने मराठवाड्यासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करायचा झाला तर वेळ अपुरा पडेल. एका वाक्यात सांगायचे झाले तर, ‘लोकमत’ने मराठवाड्याचा पुरुषार्थ जागवला. सकारात्मक पत्रकारिता केल्याने इथले अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. इथल्या जनतेच्या मागे लोकमतने हत्तीचं बळ उभं केलं. औद्योगिकीकरण, जलसिंचन, नवीन रेल्वेमार्ग अशा कितीतरी प्रश्नांना लोकमतने हात घातला. सामाजिक पत्रकारिता हा तर लोकमतचा मूलमंत्र होय. सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही मूल्यांची पाठराखण हेच लोकमतचे उद्दिष्ट राहत आलेले आहे.
प्रारंभी लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रतिकूल परिस्थितीत अक्षरधनाची पेरणी करणं, ही अवघड गोष्ट होती. आज याचा वटवृक्ष झालाय. नव्याने होत असलेल्या गुंतवणुकीच्या पार्श्वभागावर शून्यातून विश्व निर्माण केलेल्या उद्योगपतींचा सत्कार व्हावा म्हणून हा सोहळा आयोजित केल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमतचे संस्थापक व राज्याचे माजी मंत्री स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या लोकमत प्रांगणातील अर्ध पुतळ्यास लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा व संपादकीय संचालक तथा कार्यकारी संचालक, संपादकीय संचालक करण दर्डा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकमतमधील सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी सहकारी उपस्थित होते. उद्योगपतींच्या सत्कार सोहळ्यात प्रारंभी, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, करण दर्डा, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, मराठवाडा आवृत्तीचे संपादक नंदकिशोर पाटील व असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (रिसिव्हेबेल्स) प्रवीण चोपडा आदींनी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व दीप प्रज्वलित केले. नीता पानसरे-वाळवेकर यांनी सूत्रसंचालन केले तर लोकमत समूहाचे प्रेसिडेंट ओमप्रकाश केला यांनी आभार मानले.