सिल्लोड ( छत्रपती संभाजीनगर) : मद्यधुंद अवस्थेत भरधाव जीप चालवून तीन कार, एका दुचाकीला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ५ जणांपैकी ९ वर्षीय चिमुकल्या मुलीचा मंगळवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मारिया शेख सईद (रा. सेंदुर्जन, जि. बुलढाणा) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातील रहिवासी अविनाश सुखलाल मोरे (वय ४५ वर्षे) याने २६ मे रोजी सायंकाळी ६:१८ वाजता जळगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील सिल्लोड शहराजवळील एका पेट्रोल पंपाजवळ मद्यधुंद अवस्थेत भरघाव जीप (एम. एच. १९, बीजी ९०९०) भरधाव जीप चालवून रस्त्यालगत उभ्या असलेल्या तीन कारला धडक दिली. त्यातील एका कारमधील (एम. एच. ०३, सी. व्ही. २०७०) योगेश रामभाऊ चव्हाण (वय ३२ वर्षे, रा. छत्रपती संभाजीनगर) व दीपक आत्माराम आराक (रा. बुलढाणा) हे दोघे जखमी झाले. त्यानंतर या जीपचालकाने एका दुचाकीलाही (एम. एच १५, बीयू ४३८३) जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील शेख समीर शेख सलीम व समीरची आई सहेजादबी सलीम शेख व भाची शेख मारिया शेख सईद (वय ९ वर्षे) हे तिघे गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शेख मारिया शेख सईद हिचा मंगळवारी रात्री १ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात तिच्या पार्थिवावर सेंदुर्जन येथे दफन विधी करण्यात आला.
आरोपीची हर्सुल कारागृहात रवानगीया प्रकरणात पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील चालक अविनाश सुखलाल मोरे याला अटक केली होती. त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याने मद्य प्राशन केल्याचे आढळून आले. त्याच्यावर सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यास सिल्लोड येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायलयाने त्याची हर्सुल कारागृहात रवानगी केली.